पिंपरी | लोणावळा शहरातील खंडीत वीजपुरवठ्यास जबाबदार कोण?

लोणावळा, (वार्ताहर) – मागील काही आठवड्यांपासून लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा अनियमित व विस्कळीत होत असल्याने गृहिणीची व व्यवसायिकांची गैरसोय होत आहे.
तसेच नागरिकांच्या इतर अनेक तक्रारी वीज महावितरण कंपनीशी संबंधित असून या सर्व तक्रारींचा निपटारा करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? असा सवाल उपस्थित करण्यात आला असून या संदर्भात समस्त लोणावळेकर नागरिकांच्या वतीने माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी कंपनीच्या नांगरगाव येथील कार्यालयाला भेट देऊन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती व झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे केली नाहीत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फांद्या तुटून लाइनवर पडल्या व विद्युत पुरवठा ४ ते ५ तास खंडीत झाला. तसेच खंडाळा, गवळीवाडा, बाजार, कार्ला येथील कनिष्ठ अभियंत्यांकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही.
लोणावळा शहरात 2011 मध्ये गोदरेज कंपनीतर्फे भूमिगत केबल टाकण्यात आले आहेत. परंतु, मागील १४ वर्षांत 20 ते 25 टक्के शहराचा भाग सोडल्यास आजही लोणावळा शहर व परिसरात विद्युत खांबावरूनच वीज पुरवठा सुरु आहे. तब्बल 9 कोटी 40 लाख रुपये खर्च केल्या नंतरही या भूमिगत केबल कार्यान्वीत झाल्या नसतील तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न महावितरण कंपनीला या वेळी उपस्थित करण्यात आला.





