Hemant Dhome : नामदेव ढसाळ कोण? सेन्सारच्या प्रश्नावर दिग्दर्शक हेमंत ढोमे थेटच बोलला…;”हे नाव विसरायचं असेल तर…”

महाराष्ट्रातील बंडखोर कवी व दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर भाष्य करणारा चल हल्ला बोल हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला सेन्सार प्रमाणपत्र मिळावे यासाठी चल हल्ला बोल चित्रपट सेन्सार बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, सेन्सारने या चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत त्या चित्रपटातून काढून टाकण्यात याव्यात असे सांगितले आहे. तसेच कोण नामदेव ढसाळ असा सवालही सेन्सार बोर्डातील अधिकाऱ्यांनी अद्विग्नपणे केल्याचा दावा या चित्रपटाच्या टीमने केला आहे.
आता या संपूर्ण प्रकारावर मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी भाष्य करत संताप व्यक्त केला आहे. ढोमेने एक्सवर एक याविषयी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की “जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?” हा प्रश्न विचारणारा आणि अनेकांना खटकणारा पँथर होते नामदेव ढसाळ! आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर त्यांना ठणकावून सांगा… समता आणि मानवतेचा प्रसार करणारे पॅंथर होते नामदेव ढसाळ! महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला… बहुजनांचा नायक, अफाट वैश्विक महाकवी होता ‘नामदेव ढसाळ’. आपण ठणकावून सांगितलं तर आणि तरंच हे चित्र बदलेल! नुसता एक माणूस हाकलून चालणार नाही, आख्खी व्यवस्थाच बदलावी लागणार आहे. या नायकाने पेटवलेली माणसं पुन्हा पेटवावी लागणार!” असल्याची भावना ढोमे या पोस्टमधून व्यक्त केली आहे.
“जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?”
हा प्रश्न विचारणारा, आणि अनेकांना खटकणारा पॅंथर होते नामदेव ढसाळ!
आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर ठणकावून सांगा…
समता आणि मानवतेचा प्रसार करणारे पॅंथर होते नामदेव ढसाळ!
महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला…… pic.twitter.com/ijebXMULe4
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) March 1, 2025
सेन्सार बोर्डाचा आक्षेप काय?
चित्रपटाच्या संहितेत समाविष्ट असलेल्या नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर सेन्सार बोर्डाने आक्षेप नोंदविला आहे. या कवितांमध्ये शिव्या आहेत, अश्लीलता आहे असे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने मांडल्याचे चित्रपटाच्या टीमने सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी थेट “नामदेव ढसाळ कोण?” असा प्रश्न विचारला असल्याचा दावा देखील या चित्रपटाच्या टीमने केला आहे. या विधानामुळे साहित्य, कला आणि दलित चळवळीशी संबंधित अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.





