सरकारी नोकरी अन्… कोण आहे भोले बाबा? ज्यांच्या सत्संगादरम्यान घडली मोठी दुर्घटना

Hathras Stamped| उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले. सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांचा सत्संग होता. यात शेकडो भाविक सहभागी होण्यासाठी आले होते. मात्र अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला. मात्र या घटनेमुळे चर्चेत आलेले नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा कोण आहेत? याबद्दल माहितीकरून घेऊयात…
कोण आहे भोले बाबा?
नारायण साकार हरी हे मूळचे उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी गावचे रहिवासी आहेत. येथे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात होती. भोले बाबा स्वतःला इंटेलिजन्स ब्युरोचे माजी कर्मचारी असल्याचे सांगतात. 26 वर्षांपूर्वी बाबांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. आध्यात्मिक जीवनात आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले आणि ते नारायण साकार हरी म्हणून ओळखले जाऊ लागले. ५८ वर्षीय भोले बाबा उर्फ नारायण साकार विश्व हरी यांचं खरं नाव सुरज पाल सिंह अस आहे.
भोले बाबांचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत. नोकरीच्या दरम्यान त्यांनी निःस्वार्थ भावनेने भक्तांची सेवा सुरू केली. भोले बाबा सांगतात की, त्यांच्या मेळाव्यात जे काही दान, दक्षिणा, नैवेद्य येतो ते स्वतःकडे ठेवत नाहीत तर भक्तांमध्ये खर्च करतात.
नारायण साकार उर्फ भोले बाबा आपल्या पत्नीसोबत सत्संग करतात. त्यांच्या सत्संगाला ‘मानव मंगल मिलन सद्भावना समागम’ म्हणतात. सूरजपाल उर्फ भोले बाबा यांना तीन भाऊ आहेत. सर्वात मोठे सूरजपाल, दुसरा भगवान दास, ज्यांचा मृत्यू झाला आहे, तर तिसरा राकेश कुमार आहे, जे गावी शेती करतात.
याआधी अडकले होते वादात?
नारायण साकार हरीच्या सत्संगाला हजारो भक्त नेहमी येतात. दोन वर्षांपूर्वीही देशात कोरोनाची लाट सुरू असताना मे २०२२ मध्ये यूपीच्या फारुखाबादमध्ये भोले बाबांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा प्रशासनाने केवळ 50 जणांनाच सत्संगाला येण्याची परवानगी दिली होती, मात्र कायद्याची पायमल्ली करत 50 हजारांहून अधिक लोकांनी सत्संगाला हजेरी लावली. याठिकाणी जमलेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली होती. Hathras Stamped|
नेमकं काय घडलं?
हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या सत्संगात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहिले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा कार्यक्रम संपला. त्यानंतर भोले बाबा कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीच्या दिशेनं लोक निघाले. या धावपळीत काही लोक खाली पडले आणि ढकलाढकलीला सुरुवात झाली. या चेंगराचेंगरीत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश होता. यात अनेक लोक जखमी झाले आहेत.
हेही वाचा:





