Arshin Kulkarni Profile : भारताने मंगळवारी अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. युवा कर्णधार उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघाने दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये होणार आहे. त्याच वेळी, 11 फेब्रुवारीला दुसरा उपांत्य फेरीचा सामना जिंकणारा संघ भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
भारताच्या युवा खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यापैकी एक नाव अर्शीन कुलकर्णीचे (Arshin Kulkarni) आहे. अर्शीन अतुल कुलकर्णी एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा सलामीचा फलंदाज असला तरी तो उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाजही आहे. अर्शीन वेगवान गोलंदाजासह अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येत आहे. आगामी काळात तो भारताचा दुसरा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणूनही गणला जात आहे.
ज्याने सध्या चालु असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यत पाच डावात 174 धावा केल्या आणि चार बळी घेतले. या खेळाडूने आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना हैराण केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करू शकला नसला तरी या स्पर्धेत त्याने आपल्या दमदार कामगिरीने सगळ्याचे लक्ष्य त्याच्याकडे वेधले आहे.
कुलकर्णीने अ गटातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात स्फोटक कामगिरी केली. या युवा खेळाडूने अमेरिकन गोलंदाजांना लक्ष्य करताना शानदार शतक झळकावून भारताची धावसंख्या 326 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कुलकर्णीने आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. भारताने हा सामना 201 धावांच्या फरकाने जिंकला. या सामन्यात 18 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
घरची परंपरा डाॅक्टरकीची तरीही झाला क्रिकेटर…
15 फेब्रुवारी 2005 रोजी सोलापूर, महाराष्ट्र येथे जन्मलेला अर्शीन (Arshin Kulkarni) त्याच्या आजीसोबत राहतो. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने क्रिकेटला सुरुवात केली. त्याच्या आजीने त्याला सलामी खान क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. अर्शीनचे आई-वडील पेशाने बालरोगतज्ञ असून ते सोलापुरात हॉस्पिटल चालवतात. सुरुवातीला तो लेगस्पिन गोलंदाजी करायचा, नंतर त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार त्याने सीम गोलंदाजीचा सराव सुरू केला. एका क्लब गेममध्ये, त्याने सीम गोलंदाजी करताना हॅट्ट्रिक देखील घेतली, जी नंतर त्याची खास प्रतिभा म्हणून उदयास आली.
अर्शीनच्या घरची परंपरा डाॅक्टरकीची आहे. आजोबा, वडील, आई, बहीण सगळेच डॉक्टर आहेत. एका टीव्ही मुलाखती दरम्यान याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला की, घरातील सगळेच डाॅक्टर आहेत, पण मला कोणीच डाॅक्टर हो म्हटलं नाही. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत होतो. खेळण्यासाठी आई वडिलांसह बहिणीचाही पाठिंबा होता. असं त्यांन सांगितलं.
जॅक कॅलिस आहे आदर्श…
अर्शीन हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचा मोठा चाहता आहे. तो त्याला आपला आदर्श मानतो. या युवा खेळाडूने आपले संपूर्ण बालपण कॅलिसचा खेळ पाहण्यात घालवले. अंडर-19 वर्ल्डकपपूर्वी कुलकर्णी कॅलिसला भेटला होता. यादरम्यान युवा खेळाडूने माजी क्रिकेटपटूच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्याचवेळी अर्शीन याने त्याला त्यांच्या आजीने लिहिलेले पत्रही दाखवले ज्यात कॅलिसचा अर्शीनच्या कारकिर्दीवर कसा प्रभाव पडला हे नमूद केले होते.
वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट अकादमीत सरावास सुरुवात केली. सोलापुरात खूप सराव केल्यानंतर 2016-17 मध्ये कॅडन्स क्रिकेट अकादमीमध्ये निवड झाली. तेथून महाराष्ट्रातील 14 वर्षाखालील संघासाठी तो खेळला. त्यानंतर 16, 19 आणि 25 वर्षाखालील संघात खेळल्यानंतर त्यानं मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केलं. अर्शीनने 2023-24 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी देशांतर्गत पदार्पण केले. त्याने सहा सामन्यांत 121 धावा केल्या आणि चार बळीही घेतले.
महाराष्ट्र अंडर-16 स्पर्धेत त्रिशतक झळकावल्यानंतर हा युवा अष्टपैलू खेळाडू प्रकाशझोतात आला. गेल्या वर्षी 19 वर्षांखालील विनू मांकड ट्रॉफी महाराष्ट्राला जिंकून देण्यात कुलकर्णीचा मोठा वाटा होता. उपांत्यपूर्व फेरीत त्याने महत्त्वपूर्ण 60 धावा केल्या होत्या. तर अंतिम फेरीत अर्शीनने मुंबईविरुद्ध शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल 2024 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले आहे.
आशिया चषक 2024
अर्शीनने अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. त्याने 4 सामन्यात 138 धावा केल्या आणि 4 विकेट्सही आपल्या नावावर केल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी अफगाणिस्तानविरुद्ध पाहायला मिळाली. 18 वर्षीय खेळाडूने 70 धावांची दमदार खेळी करत गोलंदाजीदरम्यान 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
….आणि भारताला ‘भावी हार्दिक पांड्या’भेटला (महाराष्ट्र प्रीमियर लीग)
महाराष्ट्र प्रीमियर लीग (सोमवार, 19 जून 2023) मध्ये खेळल्या गेलेल्या ईगल नाशिक टायटन्स आणि पुणेरी बाप्पा यांच्यातील टी-20 सामन्यात या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसह अशी कामगिरी केली की विरोधक थक्क झाले. अर्शीन कुलकर्णीने ईगल नाशिक टायटन्स संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
फलंदाजी करताना अर्शिनने 54 चेंडूत 3 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. त्याने 46 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह त्याने एमपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रमही केला. या काळात अर्शीनने 216.7 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
बॅटने कहर केल्यानंतर अर्शीन कुलकर्णीने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने 4 षटकात केवळ 21 धावा देऊन 4 बळी घेतले. त्याने केवळ गोलंदाजीच केली नाही तर शेवटच्या षटकात 5 धावा डिफेंड करत आणि 2 बळी घेत आपल्या संघाला 1 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याने आपल्या संघाकडून सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. अर्शिनच्या या शानदार अष्टपैलू कामगिरीनंतर लोकांनी त्याला टीम इंडियाचा ‘भावी हार्दिक पांड्या’ म्हणून संबोधले. सांगितले.