Anant Nag: अनंत नाग कोण आहेत? ‘केजीएफ’पासून ‘मालगुडी डेज’पर्यंतचा सिनेप्रवास, दादासाहेब फाळके पुरस्काराने होणार सन्मान
Anant Nag: ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. जाणून घ्या त्यांचा थिएटरपासून ‘केजीएफ’पर्यंतचा सिनेप्रवास, गाजलेले चित्रपट आणि पुरस्कार.

Anant Nag: भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. 22 सप्टेंबर रोजी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमधील 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे कन्नड सिनेमात त्यांनी दिलेलं योगदान मोठं मानलं जातं.
अनंत नाग यांचं पूर्ण नाव अनंत नागरकट्टे आहे. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1948 रोजी कर्नाटकात झाला. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात थिएटरपासून केली. रंगभूमीवर काम करताना अभिनयाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी कन्नडसोबतच हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं.
श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका
अनंत नाग हे 1970 आणि 1980 च्या दशकात भारतीय सिनेमातील ओळखीचे नाव बनले. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘कलयुग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. त्यांच्या अभिनयाची विशेषता म्हणजे कोणतीही भूमिका अगदी सहजपणे आणि नैसर्गिक पद्धतीने साकारण्याची त्यांची शैली. त्यामुळे त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

Anant Nag
‘मालगुडी डेज’मुळे घराघरात पोहोचले
चित्रपटांसोबतच अनंत नाग यांनी छोट्या पडद्यावरही काम केलं. आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित ‘मालगुडी डेज’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी भूमिका साकारली. या मालिकेमुळे त्यांना देशभरातील प्रेक्षकांची ओळख मिळाली. या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तिचं दिग्दर्शन अनंत नाग यांचे धाकटे भाऊ शंकर नाग यांनी केलं होतं. दोन्ही भावांनी कन्नड चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं.
‘केजीएफ’मधून नव्या पिढीशी कनेक्ट
अनंत नाग यांना आजची पिढी विशेषतः ‘केजीएफ: चॅप्टर 1’ या चित्रपटामुळे ओळखते. या चित्रपटात त्यांनी आनंद इंगलागी नावाच्या पत्रकार आणि लेखकाची भूमिका साकारली. चित्रपटाची कथा सांगण्याची जबाबदारी त्यांच्या पात्रावर होती. त्यांचा शांत आवाज, संवादफेक आणि कथनाची शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
याशिवाय अनंत नाग यांनी अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासोबत 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भीष्मा’ या चित्रपटातही काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचा प्रवास जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत सुरू असल्याचं पाहायला मिळतं.
अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय
अनंत नाग यांनी केवळ अभिनय क्षेत्रातच काम केलं नाही, तर राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. ते कर्नाटक सरकारमध्ये बंगळुरू शहरी विकास मंत्री म्हणून कार्यरत होते. याशिवाय त्यांनी कर्नाटक विधान परिषद सदस्य आणि आमदार म्हणूनही काम केलं आहे.
अनेक पुरस्कारांनी गौरव
अनंत नाग यांच्या दीर्घ कारकिर्दीचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारानेही त्यांना पाच वेळा गौरवण्यात आलं आहे.
आता भारतीय सिनेमातील पाच दशकांहून अधिक काळाच्या योगदानाची दखल घेत त्यांना 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘केजीएफ’सारख्या चित्रपटापर्यंत पोहोचला. त्यामुळे अनंत नाग यांची कारकीर्द ही केवळ एका अभिनेत्याची नाही, तर भारतीय सिनेमाच्या बदलत्या काळाचीही कहाणी आहे.





