Sushil Kedia : ड्रामा बंद करा, मराठी शिकणार नाही.! राज ठाकरेंना चॅलेंज देणारा अब्जाधीश ‘सुशील केडिया’ नेमका कोण?

Sushil Kedia : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलेलं असताना, गुंतवणूक तज्ज्ञ सुशील केडिया यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांना थेट आव्हान देत खळबळ उडवून दिली आहे. “मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते बोल!” असं म्हणत केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.
त्यांच्या या वक्तव्याने आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे मराठी-अमराठी वादाला नवं तोंड फुटलं असून, मनसे कार्यकर्त्यांकडून केडिया यांना धमक्या मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
सुशील केडिया कोण आहेत?
सुशील केडिया हे शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रातील नावाजलेले तज्ज्ञ आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आहेत. त्यांनी ‘केडियानॉमिक्स’ नावाची रिसर्च फर्म स्थापन केली असून, ती शेअर बाजाराशी संबंधित सेवा पुरवते. मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत.
केडिया अनेक बिझनेस चॅनल्सवर विश्लेषक म्हणून नियमितपणे हजेरी लावतात आणि शेअर बाजार, गुंतवणूक यासारख्या विषयांवर अधिकारवाणीने बोलतात. मुंबईत गेल्या 30 वर्षांपासून राहणाऱ्या केडिया यांना हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती यासह मराठी भाषेचीही जाण आहे.
काय आहे वाद?
मराठी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात सध्या तणावाचं वातावरण आहे. मीरा रोड येथे 28 जून 2025 रोजी मनसे कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला मराठी न बोलल्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे मराठी-अमराठी वादाला आणखी चिथावणी मिळाली.
यानंतर सुशील केडिया यांनी 3 जुलै 2025 रोजी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून राज ठाकरेंना उद्देशून पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, “मुंबईत 30 वर्षं राहूनही मला मराठी नीट येत नाही. तुमच्यासारखे लोक मराठी माणसाची काळजी घेण्याचा दिखावा करत असताना, मी मराठी शिकणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतो. काय करायचंय ते बोल!” या पोस्टमुळे वादाला तोंड फुटलं.
मनसेच्या धमक्या आणि केडियांचं प्रत्युत्तर
केडिया यांच्या आव्हानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्या दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. केडिया यांनी याबाबत आणखी एका पोस्टमध्ये राज ठाकरेंना डिवचलं. “तुझ्या 2-4 गुंडांनी 10-20 थोबाडीत मारल्या तर मारु देत. पण आम्ही आमच्या पद्धतीने आमरण उपोषणाला बसलो आणि तू हात जोडून माफी मागत नाहीस, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही,” असं त्यांनी लिहिलं.
तसंच, “राज ठाकरे, तुझे शेकडो कार्यकर्ते मला अस्खलित मराठी बोलायला लावू शकत नाहीत,” असं ठणकावलं. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत सुरक्षेची मागणी केली. “मला मनसैनिकांकडून धमक्या मिळत आहेत. माझ्या सुरक्षेची जबाबदारी घ्या,” असं त्यांनी 4 जुलै रोजी पोस्ट केली आहे.
मनसेची आक्रमक भूमिका
केडिया यांच्या वक्तव्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी, “व्यापारी असाल तर व्यवसाय करा,” असं म्हणत अप्रत्यक्ष इशारा दिला. मनसेने मराठी भाषेच्या अपमानाला प्रत्युत्तर म्हणून मीरा रोड येथील दुकानदाराला मारहाण केल्याचं कबूल केलं असून, याबाबत माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पुण्यातील केदार सोमन यांना राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मारहाण केल्याचंही मनसेने मान्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांवर कठोर भूमिका घेतली आहे. “मराठी गौरवाच्या नावाखाली गुंडागिरी खपवून घेतली जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. मीरा रोड प्रकरणी सात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण नोटीस देऊन सोडण्यात आलं.





