“दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना….”; भास्कर जाधवांच्या स्टेटसने राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय म्हणाले पाहा…

Bhaskar Jadhav Status : गेल्या काही दिवसांपासून कोकणातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांवर फैऱ्या झडू लागल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत असून, दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत आरोप प्रत्यारोप करत आहेत.
हे एकीकडे सुरू असतानाच आता भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॅाट्सअॅप स्टेटसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते, दिवा विझल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही, असं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं आहे. नाराजीची चर्चा सुरू असतानाच भास्कर जाधवांने ठेवलेले स्टेटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
भास्कर जाधव हे नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. यावर स्वतः त्यांनी स्पष्टीकरण देत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, सध्या भास्कर जाधवांनी ठेवलेल्या स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. एकदा नव्हे तर दोन वेगवेगळ्या पोस्ट त्यांनी शेअर केल्याने त्यांच्या मनात काय चाललयं तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
काय आहे स्टेटस?
दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते…विझल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही. माणसाची तसंच….वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करून काय अर्थ?, असंही भास्कर जाधव स्टेटसद्वारे म्हणाले आहेत. ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव हे आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील काही नेत्यांमुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे. यामुळे आज मातोश्रीवरील उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते माध्यमांसमोर काय बोलणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया
आठवेळा निवडणूक जिंकल्यावर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. मी कोणावर नाराज नाही किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं नाही. माझ्यामध्ये अजूनही लढण्याची धमक आहे आणि संघर्ष करण्याची इर्षा आहे. 2022 साली जी घटना पक्षात घडली, त्यानतंर मी मैदानात जाऊन लढतोय, हे नाराजीचे संकेत आहेत का? मी अजूनही होतो त्याचठिकाणी ठामपणे पाय रोवून उभा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी नाराजीच्या सुरू असलेल्या चर्चांवर भास्कर जाधव यांनी दिली होती.
हेही वाचा : “आमचा हल्ला हिरोशिमा-नागासाकीसारखा..” ; इराण-इस्रायल युद्धावर ट्रम्प यांचे धक्कादायक विधान





