Satara | फोनवर बोलताना कार डिव्हायडरला धडकली

सातारा, (प्रतिनिधी) – फोनवर बोलत असतानाच अचानकपणे वेगाचं नियंत्रण सुटले अन चारचाकी कार डिव्हायडरला धडकली. सुदैवाने कारमधील एअरबॅग ओपन झाल्याने दुर्देवी घटना टळली. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार, दि. १६ जुलै रोजी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत घटनास्थळावरुन व उपस्थित पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीची चारचाकी अलथ्रोज गाडी क्रमांक (एमएच ११ डीएच १८४५) ही सातारा एसटी बसस्थानकासमोरुन निघाली. त्यावेळी एक महिला ही गाडी चालवत असताना फोनवर बोलत होती.
फोनवर बोलत असतानाच ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी रेसवर पाय ठेवला. अन रस्त्यावरील वेग नियंत्रण न करता आल्याने छ. शाहू क्रीडा संकुल येथील प्रवेशद्वाराच्या येथे पोलिसांनी बॅरीकेट लावलेले असतानाही त्याला घासून थेट सिमेंटच्या डिव्हायडरवर जावून आदळली.
या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, या चारचाकी गाडीतील एअर बॅग ओपन झाल्याने महिला चालक व गाडीतील इतर जण सुरक्षीतपणे बाहेर पडले.
यानंतर या चारचाकी गाडीचा हॉर्न अचानकपणे सतत वाजतच राहत असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे या परिसरातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या बीटमार्शलने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.





