Satara News| मतांच्या वाढीव टक्क्यांचा लाभ कोणत्या शिंदेंना?

कोरेगाव, – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महायुतीने आपला गड राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. तर परिवर्तन घडविण्याचा निर्धार करत महाविकास आघाडीने लढा देत या निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात झाले आहे. येथील दोन प्रतिस्पर्धी आमदारांच्या झुंजीत मतांच्या वाढलेल्या टक्केवारीचा लाभ कुणाला याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राज्यात लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघाला वैभवशाली परंपरा आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि अध्यक्षपद भूषविलेल्या शंकरराव जगताप यांनी तब्बल २५ वर्ष प्रतिनिधित्व केले. त्यानंतर माजी महसूल मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना होऊन आमदार शशिकांत शिंदे कोरेगावातून विजयी झाले. त्यांनी देखील दहा वर्ष प्रतिनिधित्व करताना मंत्रिपद पेलले. २०१९ मध्ये थेट लढतीत नवखे उमेदवार महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत गेली. पराभवानंतर शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेचे सदस्य करण्यात आले.
राज्यातील राजकीय फेरबदलात एका शिवसेनेच्या दोन शिवसेना आणि एका राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींची विभागणी झाली. त्यातून कोरेगावातील लढत रंगतदार झाली. दरवेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमुखी लढत देत नव्हते. यावेळी मात्र त्यांनी कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवायचे आणि आमदार शशिकांत शिंदे यांना सन्मानाने विधानसभेत पाठवायचा निर्धार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अहोरात्र मेहनत घेत होते. नेतेमंडळींपासून सामान्यातील सामान्य कार्यकर्ता देखील या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरला होता. त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे यांना आपल्या पराभवाची मालिका खंडित करायची असल्याने त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही निवडणूक हाताळली.
या उलट आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणली. करोना काळात केलेले काम त्यांच्या गाठीशी होते. त्याचबरोबर राज्यातील सत्तांतरामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने कोरेगाव मतदारसंघासाठी भरभरून निधी दिला. सुमारे ३४०० कोटी रुपयांची कामे या मतदारसंघात सुरू झाली. एकट्या कोरेगाव शहरात साडेपाचशे कोटी रुपयांची कामे झाली, त्यामुळे विकासकामांच्या बळावर आमदार महेश शिंदे निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्याबरोबर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने मजबूत साथ दिली.
महायुतीतर्फे सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर महाविकास आघाडीच्यावतीने शरद पवार यांची जाहीर सभा झाली. याव्यतिरिक्त या मतदारसंघात राज्यातील अथवा देश पातळीवरील एकाही दिग्गज नेत्याने हजेरी लावली नाही. धोम धरणातील पाण्याचे बदललेले नियोजन हा देखील विधानसभा निवडणुकीतील महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला. शेवटच्या टप्प्यामध्ये या मुद्द्याने गावोगावी खळबळ उडवून दिली. एकूणच कोरेगावात काटे की टक्कर झाली असून सर्वांच्या नजरा आता २३ तारखेच्या निकालाकडे लागल्या आहेत.





