भारतीयांची लक्षणीय लोकसंख्या असणारे देश कोणते? देशाची सीमा ओलांडून जाणारे भारतीय किती?

Indians population | जगातील काही देशांमधील भारतीयांच्या लोकसंख्या टक्केवारीच्या आधारे एक यादी तयार करण्यात आली आहे. त्यातून आपल्या देशाच्या सीमा ओलांडून बाहेर किती मिनी इंडिया आहेत ते लक्षात येते.
१) मॉरीशस – मॉरीशसमध्ये लक्षणीय संख्येने भारतीय आहेत. जवळपास या देशातील 70 टक्के नागरिक हे मूळचे भारतीय आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा स्वाभाविक ठसा दिसून येतो. तसेच भारतीय खाद्य संस्कृती, परंपरा यातून त्या ठिकाणी आपल्याला अगदी ओळखीचा प्रदेश वाटू लागतो.
२) युनायटेड किंगडम – युनायटेड किंगडमचे भारताशी अनेक वर्षांपासून सांस्कृतिक संबंध आहे. त्यामुळेच युनायटेड किंगडम मध्ये अनेक भारतीय रेस्टॉरंट दुकाने आणि संस्कृती खुणा दिसतात. त्या देशांमध्ये भारतीय संस्कृतीच्या खुणा दिसत असल्यामुळे स्वाभाविकपणे भारतीयांना आपल्या मूळच्या देशात असल्याप्रमाणे अनेकदा वाटते.
३) संयुक्त अरब अमिराती- संयुक्त अरब अमिरीतीतही मोठ्या संख्येने भारतीय आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या विकासाच्या प्रवासात स्वाभाविकपणे भारतीयांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच तुम्ही जेव्हा त्या देशात जातात तेव्हा तुम्हाला अनेकदा भारतीयांची भेट होते.
४) सौदी अरेबिया – सौदी अरेबियातही त्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला तर भारतीय लोकसंख्या 10 ते 13 टक्के एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेला भारतीय समाज त्या ठिकाणच्या समाजात कसा मिसळून गेला आहे हे सौदी अरेबिया दिसून येते.
५) कॅनडा – कॅनडा हे अनेक भारतीयांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधीचा देश म्हणून ओळखला जातो. त्या देशातील राहणीमान उच्च दर्जाचे आहे तसेच तिथे आरोग्य सेवा मोफत मिळते. या गोष्टींमुळे अनेक भारतीय कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत. त्याचबरोबर कॅनडाची बहुविध संस्कृती आणि अगत्यशील वातावरण यामुळे जगाच्या पाठीवर कुठे स्थायिक व्हायचं असा विचार येतो तेव्हा भारतीय नागरिक कॅनडाला पहिली पसंती देतात असे आढळून आले आहे.
६) सिंगापूर – या देशातील लिटिल इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी तुम्हाला भारतीय संस्कृती भारतीय खाद्यपदार्थ भारतीय सण यांची रेलचेल दिसून येते. 2023 मध्ये सिंगापूर मधील भारतीयांची लोकसंख्या ही सात लाखांवर पोहोचलेली होती. मुळात बहुविध संस्कृती असलेल्या सिंगापूरमध्ये भारतीय समाज मिसळून गेलेला आहे.
७) अमेरिका – अमेरिकेत जगाच्या पाठीवरील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय आहेत. जवळपास 70 लाख भारतीय त्या देशात राहतात. त्यामागे प्रमुख कारण म्हणजे त्या देशात भारतीयांसाठी असंख्य रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. तसेच अनेक भारतीयांनी त्या देशांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या सहजपणे उद्योग व्यवसाय उभे केलेले आहेत.
८) दक्षिण आफ्रिका – तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दक्षिण आफ्रिकेतही भारतीय लोकसंख्या लक्षणीय आहे. त्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के लोकसंख्या ही भारतीयांची आहे. तेथील भारतीय समाज त्या देशाच्या अर्थव्यवस्थेतला विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो.




