Citizenship Rules | तुम्हालाही परदेशातील वास्तव्य करायचे आहे का, आपल्या देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन करिअर करावे आणि त्या ठिकाणी स्थायिक व्हावे असे वाटते परंतु हे सगळे कसे घडून येईल, या प्रश्न मनाला सतावतो का? अनेकदा दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळणे हे कठीण आणि आव्हानात्मक काम असते. मात्र काही देशांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या सहजपणे नागरिकत्व मिळते. गुंतवणूक अनेक देशांमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्याच्या बदल्यात तुम्हाला त्या देशाचे नागरिकत्व मिळते. अर्थात त्या संदर्भातील निकष हे अनेक देशांचे वेगवेगळे आहेत. जन्म ठिकाण काही देशांमध्ये तुम्ही त्या देशात जन्मला की आपोआप तुम्हाला त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते. मग तुमच्या पालकांचे नागरिकत्व कुठल्याही देशाचे असेल तरी तो प्रश्न हा येत नाही. ब्राझील, कॅनडासारख्या देशांमध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांना आपोआपच तेथील नागरिकत्व प्राप्त होते. वंशावळ/वारसा तुमच्या कुटुंबातील पूर्वज एखाद्या देशाचे नागरिक असतील तर काही देशांमध्ये तुम्हाला त्या देशाचे नागरिकत्व सहजपणे मिळते. निकषांची पूर्तता करणे काही देशांमध्ये तुम्ही त्या देशाचे मूळ नागरिक नसला तरी काही निकष पूर्ण करून तुम्हाला नागरिकत्व मिळवता येते. गोल्डन व्हिसा पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये गोल्डन व्हिसा मिळवून तुम्ही राहू शकता. त्यासाठी तुम्हाला रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करावी लागते किंवा भांडवलाचे हस्तांतरण किंवा देणगी स्वरूपात रक्कम द्यावी लागते. त्याखेरीज या देशातील गुंतवणूक कमीत कमी पाच वर्षे ठेवावी लागते. शिवाय तुमच्यावर कुठल्याही गुन्ह्याची नोंद असून चालत नाही. पोर्तुगीज मधील कुठल्याही कराची थकबाकी चालत नाही. स्पेनचे निवासी होण्यासाठी काय करावे लागणार? स्पेनचे निवासी होण्यासाठी तुम्ही कमीत कमी पाच लाख युरो एवढी गुंतवणूक करावी लागते. प्रत्यक्ष नागरिकात्वासाठी अर्ज करताना तुम्ही दहा वर्ष त्या देशात राहत असल्याचा पुरावा आणि तुम्हाला स्पॅनिश भाषा येत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. तुम्ही सलग दहा वर्ष स्पेनमध्ये राहत असला तरी सुद्धा प्रत्येक वर्षी किमान 183 दिवस तरी स्पेनमध्ये राहणे आवश्यक असते. स्पेनमधील कुठल्याही कराची थकबाकी असून चालत नाही. कुराकावो हा कॅरिबियन बेटातील छोटासा देश आहे. या देशामध्ये इन्वेस्टर परमिट प्रोग्राम कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कमीत कमी दोन लाख 80 हजार अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून या ठिकाणी नागरिकत्व मिळवू शकता. विशेष म्हणजे या देशाचे नागरिकत्व असले की तुम्हाला नेदरलँड चे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला होतो. कारण हा देश हा किंगडम ऑफ नेदरलँडचा स्वायत्त देश अशा दर्जा प्राप्त केलेला देश आहे. माल्टा या देशातही इन्वेस्टर प्रोग्राम कार्यान्वित आहे. तुम्ही या देशात किमान 36 महिने वास्तव्याला असाल आणि तुम्ही सहा लाख युरो एवढी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्या देशाचे नागरिकत्व मिळू शकते. तुम्ही रियल इस्टेट मध्ये सात लाख युरो एवढी गुंतवणूक केली तरी चालू शकते. अँटीग्वा आणि बार्ब्युडा अँटीग्वा आणि बार्ब्युडा या देशातील नॅशनल डेव्हलपमेंट फंडामध्ये किमान एक लाख अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते किंवा सरकार मान्यता प्राप्त रियल इस्टेट प्रकल्पात सुमारे चार लाख अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केल्यास तुम्ही नागरिकत्व मिळण्याचे निकष पूर्ण करू शकता. याशिवाय तुमचे क्रिमिनल रेकॉर्ड स्वच्छ असावे लागते. चांगले आरोग्य आणि निष्ठेची शपथ घेतल्यावर या देशाचे नागरिकत्व मिळते. विशेष म्हणजे भारतातील बँकांना फसवून फरार झालेला मेहुल चोक्सी या देशात वास्तव्याला आहे. सेंट किटस् अँड नेव्हीस सेंट किटस् अँड नेव्हीस या देशाच्या नागरिकत्वासाठी तुम्हाला तेथील सरकार मान्यता प्राप्त रियल इस्टेट प्रकल्पात चार लाख डॉलर्सची गुंतवणूक करावी लागते किंवा अन्यत्र दोन लाख अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते. त्याखेरीज या देशाच्या शाश्वत विकास फंडामध्ये तुम्ही एक लाख 50 हजार अमेरिकी डॉलरची देणगी दिल्यावरही तुम्ही नागरिकत्वासाठी पात्र ठरता. मात्र ही रक्कम परत मिळत नाही.