Work Visas | सुलभपणे वर्किंग व्हिसा मिळणारे चार देश आहेत. याद्वारे कुशल कर्मचारी व कामगारांची सहजरीत्या राहण्याची सोय होते. यात जर्मनी, न्युझीलँड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया देशांचा समावेश आहे. जर्मनी – या देशाने स्थलांतरितांच्या बाबतच्या कामकाजात क्रांतिकारक बदल केले आहेत. त्यासाठी जर्मनीने कुशल स्थलांतरित कायदा मार्च 2024 पासून लागू केलेला आहे. त्यामुळे विविध देशातील कुशल लोकांना जर्मनीमध्ये सहजपणे राहणे आणि नोकरी करणे शक्य झालेले आहे. आता या देशांमध्ये गुणांकावर आधारित सुस्पष्ट असे स्थलांतरांतांसाठीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. कॅनडाच्या धर्तीवरच हे धोरण आहे. त्यानुसार तुमच्याकडे विद्यापीठाची पदवी असेल आणि जर्मन भाषेचे मूलभूत ज्ञान असेल तर तुम्ही जर्मनीत नोकरी करण्यास पात्र ठरू शकता. त्यासाठी जर्मनीने अपॉर्च्युनिटी कार्ड जारी केलेले आहे. त्याद्वारे नोकरी हवी असणाऱ्या व्यक्ती जर्मनीमध्ये येऊन नोकरी शोधण्यासाठी एक वर्ष राहू शकतात. म्हणजेच हातात नोकरी नसली तरी एक वर्ष राहण्याची मुभा असते. कुशल कर्मचारी आणि कामगारांसाठी दोन ते चार आठवड्यात विसा उपलब्ध करून दिला जातो. याआधी त्यासाठी सात ते आठ महिन्याचा कालावधी लागत असे. न्युझीलँड – या देशाने इसेन्शियल स्किल्स वर्क विसा कार्यक्रम लागू केलेला आहे आणि त्याद्वारे विविध देशातील कुशल कर्मचारी व कामगारांचे न्यूझीलंडमध्ये स्वागत करण्यात येते. अशा लोकांचा विसा 15 ते 20 दिवसात जारी केला जातो. मात्र न्यूझीलंडमध्ये तुलनेत कमी वेतन मिळते. कुशल कामगाराला साधारणपणे वार्षिक 56 हजार न्युझीलँड डॉलर एवढे वेतन मिळते. विकसित देशांच्या तुलनेत हे अतिशय अल्प वेतन मानले जाते. कॅनडा – जगभरातील गुणवत्ता असलेल्या कुशल कर्मचारी आणि कामगारांना कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळतात. त्यासाठी कॅनडामध्ये एक्सप्रेस एन्ट्री सिस्टीम अस्तित्वात आहे. त्यानुसार कॅनडात येऊ इच्छिणाऱ्यांच्या अर्जावर सहा महिन्यात पूर्ण प्रक्रिया करून निर्णय दिला जातो. आता तर हा कालावधी तीन महिन्यांवर आलेला आहे. या देशातील कॅनडियन एक्सपिरीयन्स क्लासमध्ये नुकतेच बदल करण्यात आले आहेत आणि त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि तात्पुरत्या कामगारांना कायमस्वरूपी निवासी परवाना मिळणे सोपे झाले आहे. त्यातही फ्रेंच भाषा बोलणाऱ्यांना अतिरिक्त गुण आणि प्राधान्य मिळते. या देशात प्रांतानुसार वेतनात फरक होत असतो. मात्र कुशल कामगारांना साधारणपणे वार्षिक 50 हजार कॅनेडियन डॉलर एवढे वेतन मिळते. ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियामध्ये टेम्पररी स्किल शॉर्टेज (टीएसएस) विसा सहजपणे प्राप्त होतो. त्यासाठी मध्यम आणि दीर्घ मुदतीची विविध कौशल्यांबाबतची यादी तयार करण्यात आली असून साधारणपणे दोन ते चार महिन्यात विसाची प्रक्रिया पूर्ण होते. त्याखेरीज काही विशिष्ट कौशल्यांबाबत व्हिसासाठीची वयोमर्यादा 45 वरून 50 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याद्वारे अधिक अनुभवी व्यावसायिकांसाठी ऑस्ट्रेलियाने आपली दारे खुली केलेली आहेत. या देशात अनेक क्षेत्रात कामगारांच्या अतिशय तुटवडा भासत असल्याने रिजनल विसा प्रोग्राम द्वारे काही प्रदेशांमध्ये तर कुशल कामगारांचे व्हिसाविषयक अर्ज सहा ते आठ आठवड्यात मार्गी लावले जातात. 2024 मध्ये या देशात कमीत कमी वेतन वार्षिक 70000 ऑस्ट्रेलिया डॉलर एवढे होते.