“लाडकी बहिण योजने’चे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार? दोन मिनिटांत तुमच्या मोबाईलवर घरबसल्या तपासा…

Ladki Bahin Yojna: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले असून 17 ऑगस्टला महिलांच्या बॅंक खात्यात 3 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या महिलांचे अर्ज स्वीकारले आहेत त्याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.
तर यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यावर नंतर एकदाच तीन हप्त्यांचे एकून साडेचार हजार रुपये जमा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेसाठी राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या योजनेसाठी शासनाकडून 33 हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. यासाठी फक्त आधारकार्ड नं टाकून याबाबतची माहिती पाहता येणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही. कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.
पैसे कोणत्या खात्यात येणार तपासण्याची सोपी पद्धत –
– तुमच्या मोबाईलवर क्रोममध्ये https://myaadhaar.uidai.gov.in/ ही वेबसाईट उघडा
– येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड, ओटीपी टाकून लॉगइन करा.
– त्यानंतर Bank Seeding Status (बॅंक सीडिंग स्थिती) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
– यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि बँकेचे नाव दिसेल. आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
– आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.





