‘तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार?’; बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून मनसेचा सरकारला सवाल

मुंबई – बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मागील तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून सरकारवर टीका केली आहे.
मनसेने ट्वीट करत लिहिले की, “मुंबईतील बेस्ट प्रशासनाने काँट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत संपावर जाणाऱ्या चालकांची संख्या वाढत आहे. आणि ह्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे. बेस्ट प्रशासन झोपलं आहे का? मुळातच ह्या काँट्रॅक्टर्सच्या बसेस रस्त्यात बंद पडणं, त्यांची देखभाल नीट नसणं ह्या तक्रारी होत्याच. ह्या सगळ्यावर बेस्ट प्रशासनाने कधीच कारवाई केल्याचं दिसलं नाही. आणि आता तर थेट ह्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आणि मुंबई वेठीला धरली गेली.
मुंबईतील बेस्ट प्रशासनाने काँट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत संपावर जाणाऱ्या चालकांची संख्या वाढत आहे. आणि ह्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे. बेस्ट प्रशासन झोपलं आहे का?… pic.twitter.com/e5Eq5hJm69
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 4, 2023
हा संप होणार आहे त्यावर आधीच कारवाई करावी आणि काही तयारी करावी असं बेस्ट प्रशासनाला वाटलं नाही? ट्रॅक्टर्स बेस्ट प्रशासनाला वेठीस धरू शकतात आणि त्यातून बेस्ट प्रशासनाची नाचक्की होत आहे ह्याच प्रशासनाला काहीच वाटत नाही का? ह्या काँट्रॅक्टर्सना संप रोखण्यात अपयश आलं म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, बेस्टला झालेल्या नुकसानीची भरपाई कधी आणि कशी करून घेणार? राज्य सरकार ह्यावर नक्की काय पावलं उचलत आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपणांस विनंती आहे की आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे, तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मुंबईकर त्रस्त आहे, “असे काही सवालही यावेळी मनसेने केले आहेत.





