पिंपरी | धनुष्यबाण लक्ष्य साधणार की, मशाल पेटणार

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघातील लढत ही थेट शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात झाल्याचे चित्र आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते पण त्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचे दिसले नाही.
मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या किमान सात टक्के मतदानात घट झाली. तर, २०१४ च्या निवडणुकीच्या आठ टक्के घट झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या वाढणारा चिंचवड विधानसभा असली तरी, मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याने धनुष्यबाण लक्ष्य साधणार की, काही मतांच्या फरकाने मशाल पेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमावरी (दि. १३) मतदान पार पडले. पनवेल, उरण, कर्जत या तीन विधानसभा घाटाखाली तर, पिंपरी, चिंचवड, मावळ या तीन विधानसभा घाटाच्या वरील अर्थात मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. मात्र, सोमवारी झालेल्या मतदानाकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसले. यामध्ये सुमारे सात टक्क्यांनी घट होत एकूण ५२.९० टक्के मतदान झाले.
टक्केवारी घटण्याची कारणे
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचे दिसले नाही. घटलेल्या मतदानामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे पिंपरी-चिंचवडकरांनी मतदानापेक्षा इतर गोष्टींना महत्त्व दिल्याचे या आकडेवारीवरून दिसते. कारण शनिवारपासून शहरातील रस्ते व वाहतूक कोंडी बऱयाच प्रमाणत कमी झालेली दिसत होती.
तसेच केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी, शंभर मीटरवर वाहने थांबविणे, अनेकांना स्लीपा न मिळणे, तर, काहींना मोबाइलवर मेसेज, व्हॉट्सॲपवर स्लीपा असणे, पोलिसांनी अडवणूक केल्याने काहींनी थेट घर गाठणे पसंत केले. तर,अनेकांची नावेच यादीत सापडली नाहीत. परिणामी अनेकजण मदतान न करताच निघून गेले. तर, काहींनी वाद घातला.
बारणेंची हॅटट्रीक होणार का?
मावळ लोकसभा हा प्रामुख्याने शिवसेनाचा मानला जातो. सलग तीन वेळा शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या मावळ मतदारसंघाचा गड राखण्यासाठी यंदा सेनेतच लढाई जुंपली आहे. बदलत्या राजकीय समीकरणात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे महायुतीच्या माध्यमातून विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक आहेत.
मात्र, त्यांच्यापुढे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी आव्हान निर्माण केले आहे. बारणेंची ही तिसरी निवडणूक असून त्यांची हॅटट्रीक होणार का? असा प्रश्न आहे. धनुष्यबाण चालणार, की मशाल पेटणार हे मतदारच ठरविणार आहेत. तर, हा घटलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार व विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ४ जून रोजी समजेल.
मतदारांच्या भूमिकेला महत्त्व
मागील तिन्ही निवडणुकांतील लढती घाटावरील दोन प्रमुख उमेदवारांमध्ये झाल्या आहेत. २००९ मध्ये गजानन बाबर विरुद्ध आझम पानसरे, २०१४ मध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध लक्ष्मण जगताप आणि २०१९ मध्ये बारणे विरुद्ध पार्थ पवार अशा लढती झाल्या आहेत. यंदा सलग चौथ्यांदा घाटावरील उमेदवार बारणे विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील आमनेसामने आहेत. विजयाची माळ घाटावरील उमेदवाराच्याच गळ्यात पडणार असली तरी, मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
मावळ लोकसभा मतदार संघ
वर्ष मतदानाची टक्केवारी
२०१४ ६०.११
२०१९ ५९.५९
२०२४ ५२.९०





