“…असा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही”; संभाजीराजे छत्रपतींनी थेट पुरावेच केले सादर

Sambhaji Raje Chhatrapati | रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाकावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
याआधीही अनेकदा वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित केला होता. आता संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची मी भेट घेतली. त्यांना सविस्तरपणे जो काही इतिहास आहे, शिवभक्तांनी माहिती अधिकारात जी माहिती मिळवलीय ती त्यांच्यासमोर मांडली. पुरातत्व खात्याने त्यात स्पष्टपणे नमूद केल आहे, वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारक म्हणून कुठेही नोंद नाही. या वाघ्या कुत्र्याच स्मारक 1936 ला पूर्ण झालं. 2036 पर्यंत हे स्मारक हटवलं नाही, तर प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट म्हणून त्याची नोंद होईल. म्हणून हा विषय मी घेतलेला आहे. आधी शिवभक्तांनी प्रयत्न केला, त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणून मी ही लाईन घेतली. शिवाजी महाराजांना अग्नि दिला, त्यावेळी त्यात वाघ्या कुत्र्याने उडी मारल्याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही”, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
वाघ्या कुत्र्याचा एकही पुरावा मिळणार नाही
“यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना काही फोटो दाखवले. महाराष्ट्रातल्या एकाही इतिहासकाराने मग ते डाव्या, उजव्या किंवा सेंटर विचारसरणीचा असो, वाघ्या कुत्र्याचे पुरावे असल्याच म्हटलेलं नाही. राजसंयास नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्या दंतकथेतून हा वाघ्या कुत्रा प्रगट झाला, त्याचं स्मारक बांधलं. पण वाघ्या कुत्र्याचा एकही पुरावा मिळणार नाही.
१९२५ ला छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हायच्या आधीची काही छायाचित्र आहेत. १९२६ ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती. त्या समितीनं स्मारकाचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्यावेळी पुरातत्व खात्याने दोन हजार रुपये दिले होते. तेव्हाच्या सरकारने पाच हजार रुपये दिले होते. तेव्हा अनेक शिवभक्तांनीही स्मारकासाठी मदत केली होती. त्यातून शिवरायांचं स्मारक पूर्ण झालं”, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. Sambhaji Raje Chhatrapati |
सर्व इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मला बोलवा, जे विरोध करतायत त्यांना बोलवा. समोरासमोर बसून आपण बोलू. कुठे पुरावे आहेत? वाघ्या कुत्र्याच्या स्मारक हे शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे. हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल?” असा सवाल संभाजीराजेंनी विचारला. Sambhaji Raje Chhatrapati |
इथे जातीचा विषय येतो कुठे?
“धनगर समाज हा इतका विश्वासू आहे की, मला आयुष्यभर ज्यांनी सांभाळलं, जेवण दिलं, राजवाड्यातील कुक धनगर समाजाचा आहे. माझा सेवक, माझा चालक तो इतका विश्वासू आहे की, तो सुद्धा धनगर समाजाचा आहे. माझा अंगरक्षक धनगर समजाचा आहे. इथे जातीचा विषय येतो कुठे? वाघ्या कुत्र्याच आपण स्थलांतर करु शकतो. रायगड किल्ल्याच्या खाली चांगला प्रोजेक्ट होईल, तिथे स्थलांतर करु शकतो”, असा सल्लाही संभाजीराजे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा:
शेळ्या-बोकडांचा ‘चोर बाजार’ उद्ध्वस्त! दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई





