Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : राज्य सरकारच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज (४ सप्टेंबर) एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
यावेळी लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याबाबत विचारले असता, तटकरे यांनी स्पष्ट केले की, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यांमध्ये जमा होईल. तसेच, योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित पडणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) द्वारे दिले जातात. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता होती. याबाबत तटकरे यांनी सांगितले की, “लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे.” योजनेच्या नियमांनुसार, हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो, पण काही वेळा तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर होऊ शकतो.
गेल्या महिन्यांत जुलै हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा करण्यात आला होता, तर एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्ते महिनाअखेरीस जमा झाले होते. ऑगस्ट हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण तटकरे यांच्या विधानानुसार तो लवकरच येईल. जर विलंब झाला तर सप्टेंबर महिन्यात संयुक्त हप्ता (ऑगस्ट + सप्टेंबर) म्हणजे ३,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. लाभार्थी महिलांना ladkibahin.maharashtra.gov.in वर किंवा हेल्पलाइन १८१ वर स्टेटस तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
२१०० रुपयांची वाढ कधी?
योजनेच्या हप्त्यात २१०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत विचारले असता, तटकरे यांनी सांगितले की, “आमचे जे घोषणापत्र आहे ते पाच वर्षाचे आहे. योग्य वेळी आम्ही नक्कीच २१०० रुपये देणार.” महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत (२०२४) हा वादा केला होता, पण अद्याप तो अंमलात आणलेला नाही.





