पुणे | अभियांत्रिकी प्रवेशाला मुहूर्त कधी?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पुढच्या आठवड्यात अभियांत्रिकी, फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रत्यक्षात अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते.
आतापर्यंत अभियांत्रिकी, फार्मसीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष प्रवेशाला जुलै उजाडणार असल्याचे दिसत आहे. आगामी प्रवेशाबाबत काहीच स्पष्टता नसल्याने विद्यार्थीसह पालकही चिंतेत आहेत.
यावर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलमार्फत सीईटी घेण्यात आली. त्याचा निकालही करण्यात आला. त्यात एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर झाला.
त्यापूर्वीच बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतरच मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू होते. तसेच, पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे प्राप्त केली. पण प्रवेश कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एमबीए, एमसीए, फार्मसी, एमटेक, आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट, विधी यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी झाली. निकालही जाहीर झाला. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होते. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जाते.
अर्जासह सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागते. त्यानंतर गुणांनुसार प्रवेशासाठी निवड केली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होते. तीच अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
कॅप राऊंड सुरू करा
नीटसह अन्य प्रवेश परीक्षेवरुन पालक चिंतेत आहेत. त्यातच एमएचटी-सीईटीच्या निकालवरुन संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रवेशाची फेरीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे अपेक्षित आहे.
प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीन कॅप राऊंड होतात. त्यानंतर जागा रिक्त असल्यास संस्थास्तरावर प्रवेश दिले जाते. त्यामुळे राज्य सीईटी सेलने तत्काळ प्रवेशाची फेरी सुरू करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.
आता प्राचार्यांची बैठक
राज्य सीईटी सेलने राज्यभरात तंत्रशिक्षण प्रवेशाच्या संबंधित काही प्राचार्यांची बैठक दि.२८ व २९ जून रोजी बोलविली आहे. त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवर चर्चा होणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष प्रवेश जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे.





