IND vs PAK : ‘जेव्हा देशाचा नेता स्वतः फ्रंट फुटवर बॅटिंग करतो, तेव्हा….’, सूर्यकुमार यादवकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

Suryakumar Yadav on PM Narendra Modi : भारतीय संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत नवव्यांदा ट्रॉफीवर नावावर कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. सूर्यकुमार यादवने सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या “फ्रंट फुटवरील बॅटिंग” ने संपूर्ण संघाला प्रेरणा दिली आणि खेळाडूंना निर्भयपणे खेळण्याचा आत्मविश्वास दिला.
आशिया कप 2025 चे जेतेपद पटकावल्यानंतर एएनआयशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “जेव्हा देशाचा नेता स्वतः फ्रंट फुटवर बॅटिंग करतो, तेव्हा असे वाटते की तो स्वतः स्ट्राइकवर उभा राहून धावा काढत आहे. जेव्हा ‘सर’ समोर उभे असतात, तेव्हा खेळाडूंचा उत्साह आपोआप वाढतो आणि ते मोकळेपणाने खेळतात.”
#WATCH | Dubai, UAE: On PM Modi’s tweet “Operation Sindoor on the games field”, Indian skipper Suryakumar Yadav says, “It feels good when the country’s leader himself bats on the front foot; it felt like he took the strike and scored runs. It was great to see, and when the sir is… pic.twitter.com/nLLsgwuqPI
— ANI (@ANI) September 29, 2025
‘ऑपरेशन सिंदूर’शी जोडला विजयाचा जल्लोष –
भारतीय संघाच्या विजयानंतर काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर या विजयाला “खेळाच्या मैदानावरील ऑपरेशन सिंदूर” असे संबोधले. त्यांनी या विजयाला मे 2025 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय सैन्याने केलेल्या रणनितीक कारवाईशी जोडले, जी 22 अप्रैलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केली गेली होती. या हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा – Team India : बीसीसीआयचा टीम इंडियावर बक्षीसांचा वर्षाव! ‘या’ तीन विजयानंतर मिळाले तब्बल २०४ कोटी रुपये
ट्रॉफी न मिळण्यावर सूर्यकुमारची प्रतिक्रिया –
भारताने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद पटकावले, तरीही खेळाडूंना जेतेपदाची ट्रॉफी मिळाली नाही. एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी न सुपूर्द केल्याच्या घटनेवर सूर्यकुमार म्हणाला, “ट्रॉफी ही केवळ एक प्रतीक आहे. खरी ट्रॉफी म्हणजे लोकांची मने जिंकणे, खेळाडूंचा विश्वास, सहाय्यक कर्मचाऱ्यांचा आधार आणि पडद्यामागे मेहनत करणाऱ्या प्रत्येकाची साथ. तीच खरी ट्रॉफी आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून विजयाचा आनंद साजरा केला. ट्रॉफीच्या वादाला आम्ही महत्त्व देत नाही. तुम्ही फोटोंमध्ये पाहिलेच असेल, एक ट्रॉफी तिथे होतीच.”





