पुणे जिल्हा | गव्हाचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटले

बेलसर, {निखील जगताप} – पुरंदर तालुक्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात गहू पिकाची पेरणी होत होती; परंतु यंदाच्या वर्षी पावसाचे अत्यंत कमी प्रमाण असल्याने तसेच पाण्याची उपलब्धता नसल्याने तालुक्यातील पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी घटली आहे. मागील रब्बी हंगामात(2022-23) 5066.42 हेक्टरवर पेरणी झाली होती; परंतु यंदा 2576.1 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
रब्बी हंगामात पेरणी करण्यात आलेला गहू आता मळणीला आला आहे; परंतु पावसाचे व पाण्याचा अंदाज घेवुन अनेक शेतकर्यांनी उशीरा पेरणी केली होती त्याचे दाणे पक्व होत आहेत.गव्हाची पेरणी तालुक्यात यंदा कमी झाली आहे. तालुक्यात बागायती व जिरायती क्षेत्रात मिळून सुमारे 2576.1 हेक्टरवर झाली आहे. तालुक्यात 5135.2 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत होती; परंतु पेरणी सुमारे 2559.1 हेक्टर कमी झाली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या 32 ते 50 रुपये प्रती किलोने गहू विकला जात आहे. मागील हंगामात गव्हाचे दर कमी होते; परंतु यंदा गव्हाची पेरणी कमी झाल्याने उत्पन्न कमी होणार असल्याने भाव वाढणार असल्याचे व्यापारी सांगातात. यंदाही दरांबाबत अपेक्षा नव्हती. कारण गहू मोफत रेशन दुकानांत उपलब्ध होतो.
दुसरीकडे पुरंदर तालुक्यात पाऊसमान कमी असल्याने दुष्काळ जाहीर झाला असून अनेक भागात कूपनलिका, विहिरींचे जलसाठे तळाला गेले आहेत. गव्हास पूर्ण कालावधीत 5 ते 6 वेळा पाणी द्यावे लागते. तसेच खते व अन्य खर्चही अधिक आहे. यामुळे यंदा अनेकांनी गहू पेरणी टाळली आहे. तालुक्यात वीर व गराडे धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये थोड्या अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे; परंतु पेरणीच कमी झाल्याने हातात येणारे उत्पन्न घटणार आहे.
इतर पिकांवर भर
तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे गहू पीक टाळून मका, कडवळ, ज्वारी तसेच नेपियर घासाची लागवड अधिक प्रमाणात झाली आहे. तर हरभरा व ज्वारी पिकाचीही पेरणी झाली आहे.
वेळेत पेरणीचा गहू पक्व
वेळेत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसर्या आठवड्यात पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे पक्व होऊन ते मळणीवर आले आहे. दाणे कडक झाल्याने त्याचे सिंचन बंद करावे लागले आहे. कारण सिंचन पाट पद्धतीने केले जाते. त्यात सध्या वेगाचा वारा व पावसाळी वातावरण आहे. यात पीक आडवे होण्याची शक्यता अधिक असते.
आवक एप्रिलपर्यंत सुरू राहणार?
पुढील आठवड्यात गव्हाची मळणी सुरू होईल. उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे पक्व होत आहेत. काही भागात जानेवारीतही पेरणी झाली असून, काहींचे पीक अद्याप निसवलेले नाही. अशा स्थितीतील पिकास आणखी दोन वेळेस पाणी द्यावे लागेल. यामुळे तालुक्यातील गव्हाची मळणी व आवक एप्रिलपर्यंत सुरू राहील, असाही अंदाज कृषीतज्ञांनी व्यक्त केला आहे.
जिरायती व बागायती क्षेत्रातील गहू पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)
वर्ष**सरासरी क्षेत्र***पेरणी क्षेत्र*** टक्के
2022-23***5135.2***5066.42***98.66
2023-24***5135.2***2576.1 ****50.16





