Whatsapp Down: व्हॉट्सअॅप डाऊनमुळे जगभरातील युजर्स हैराण: संदेश पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मिम्सची रेलचेल

Whatsapp Down: जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आणि तातडीच्या संदेशवहनासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅप या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या अनेक युजर्सना संदेश पाठवणे, स्टेटस अपलोड करणे आणि अॅप उघडण्यात अडचणी आल्या. विशेष म्हणजे, याच दिवशी दुपारी 1 वाजता युपीआय व्यवहारांमध्येही तांत्रिक अडचण आली होती, जी 57 मिनिटांनंतर पूर्ववत झाली. मात्र, आता व्हॉट्सअॅपमधील या समस्येमुळे नेटिझन्समध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले.
मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीने व्हॉट्सअॅपची मालकी घेतली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक युजर्सना संदेश पाठवण्यात आणि स्टेटस ठेवण्यात अडथळे आले. डाऊनडिटेक्टर या वेबसाइटवरही अनेक युजर्सनी व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. या घटनेनंतर सोशल मीडियावर युजर्सनी ट्विटरसह इतर प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याची माहिती शेअर केली. यासोबतच, अनेकांनी मजेशीर मिम्स आणि विनोद शेअर करत या परिस्थितीवर हलक्या-फुलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.





