Pune | पाच टक्के पडताळणीने काय होणार?

पुणे : निवडणुकीत पराभव झाल्यावर ईव्हीएमवर खापर होण्याची प्रथा पडली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्याच प्रथेनुसार महाविकास आघाडीने पराभवाचे खापर ईव्हीएम मशीन वर फोडले आहे. पुणे जिल्ह्यातील पराभूत झालेल्या 11 उमेदवारांनी ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त केला असून पुन्हा मतमोजणीची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेले शुल्क सुध्दा उमेदवारांनी शासकीय तिजोरीत जमा केले आहे.
निवडणुक आयोगाच्या नियमात मतमोजणीची पडताळणी करण्याची तरतूद आहे. तथापि, मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जाते. उमेदवारांना पडताळणीची संधी देत ईव्हीएम मशीनची सत्यतेची खात्री पटवून दिली जाते. पडताळणीची प्रक्रिया मतमोजणीच्या 45 दिवसानंतर केली जाते.
उमेदवाराने अर्ज केलेल्या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी उपलब्ध करून जातात. त्यावेळी त्यावेळी संबधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी उपस्थित असतात. सुरुवातीला संबधित मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमधील डेटा पूर्णत: क्लिअर केला जातो. त्यानंतर उमेदवाराला त्या मशीनमध्ये बाराशे वेळा मतदान करण्याची संधी दिली जाते.
त्यावेळी उमेदवाराने प्रत्यक्षात केलेले मतदान आणि मशीनमध्ये झालेले मतदान याची पडताळणी केली जाते. पण येथे आरोप बॅटरी किती टक्के चार्ज होती आणि मशीन हॅक केले याचा आहे. ते कसे स्पष्ट होणार? लोकांना तर रशियाच्या पुतीन यांच्या मॉडलेची, सॅटलाइटद्वारे केलेल्या हॅकिंगचीही शंका आहे. पाच टक्के मशिनने काय होणार आहे?





