ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे तुमच्या खिशावर परिणाम? काय महागणार, काय स्वस्त होणार? जाणून घ्या

Trump Tarrifs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर अवघ्या जगभरात राजकीय आणि आर्थिक परिणाम पाहायला मिळत आहेत. सत्तेत येताच अवैध स्थलांतरितांविरोधात कठोर पावलं उचण्यापासून ते हमास- इस्त्रायल, युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचे प्रयत्न ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. आता जगभरातील अनेक देशांशी ‘टॅरिफ वॉर’ अर्थात आयात शुल्क युद्ध सुरू केलं आहे.
या धोरणाचा फटका सध्या 100 पेक्षा अधिक देशांना बसत आहे. अमेरिकेने या देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर किमान 10% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. 2 एप्रिलपासून लागू झालेलं हे धोरण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कठोर व्यापार धोरण मानलं जात आहे.
भारतावर थेट परिणाम
भारतदेखील या टॅरिफ युद्धात अडकलेला प्रमुख देश आहे. आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या कोणत्याही वस्तूंवर किमान 26% टॅरिफ लावलं जाणार आहे. याचा परिणाम भारतातील ज्वेलरी मार्केट, वस्त्र निर्यात, मोबाईल उपकरणं, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या अनेक क्षेत्रांवर होणार आहे. या धोरणामुळे काही वस्तू महाग होतील, तर काही वस्तूंच्या किमती कमी होतील.
ट्रम्प यांचा ‘जशास तसे’ प्रतिसाद
ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे की भारत अमेरिकेच्या वस्तूंवर 52% पर्यंत टॅरिफ लावतं, जे अन्यायकारक आहे. त्यामुळे अमेरिकेला दरवर्षी $46 अब्जचा व्यापार तोटा सहन करावा लागतो. त्याविरोधात ‘जशास तसे’ धोरण राबवत अमेरिकेने भारतावरही टॅरिफ वाढवले आहेत.
जागतिक चिंता आणि मंदीची भीती
एका वेळी 100 पेक्षा अधिक देशांवर अतिरिक्त टॅरिफ युद्ध छेडून अमेरिकेने संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेची चिंता वाढवली आहे. भारत, युरोप आणि इतर देश याचा गंभीर परिणाम होईल की काय, अशा भीतीने चिंतेत आहेत. अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की यामुळे जगात नवीन आर्थिक मंदी ओढवू शकते.
भारत-अमेरिका व्यापाराचं समीकरण
भारतात अमेरिकन गाड्यांवर 70% पर्यंत आयात कर लागतो, त्यामुळे अमेरिकन गाड्या भारतात महाग पडतात. उलट भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या तांदूळ, सफरचंद, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्यावर कमी शुल्क घेतलं जातं.
दागिने स्वस्त, मोबाईल महाग
भारत अमेरिकेला दरवर्षी $11.8 अब्ज किमतीचे दागिने निर्यात करतो. टॅरिफमुळे ही निर्यात घटल्यास देशांतर्गत पुरवठा वाढेल आणि भारतात दागिने स्वस्त होतील. मात्र, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर परिणाम होऊन ते महाग होतील. भारतातून $14.39 अब्ज किमतीची मोबाईल उपकरणं आणि $4.93 अब्ज किमतीचे कपडे अमेरिकेत जातात. याशिवाय, सध्या औषधांवर टॅरिफ लावण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर टॅरिफ लागू केल्यास अमेरिकेतील नागरिकांना औषधांसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.
Nike, Adidas आणि आयफोन महाग
अमेरिकेने व्हिएतनामवर 46% टॅरिफ लावलं आहे, जेथे Nike, Adidas कपडे तयार होतात. त्यामुळे हे ब्रँड्स आता महाग होण्याची शक्यता आहे. तसेच आयफोनचे उत्पादन चीन, मलेशिया, व्हिएतनाममध्ये होत असल्यामुळे टॅरिफ वाढीचा परिणाम आयफोनवरही होणार आहे. प्रामुख्याने अमेरिकन ग्राहकांना याचा फटका बसू शकतो.
भारतातून अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या कृषी उत्पादन, दागिन्यांच्या निर्यातीला या धोरणामुळे फटका बसेल. अमेरिकेला या गोष्टींची निर्यात कमी झाल्यास, भारतातील साठा वाढेल व देशात वस्तूंच्या किंमती कमी होतील.





