अदानी-ट्रम्प प्रशासन यांच्यात काय झाली चर्चा? अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर उसळले

मुंबई – अदानी समुहातील प्रतिनिधींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील काही अधिकार्यांबरोबर चर्चा केल्याचे वृत्त माध्यमातून पसरले. अदानी समूहासंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप अमेरिकेच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. हे आरोप रद्द केले जावेत यासाठी ही चर्चा करण्यात आली असल्याचे बोलले जाते. या घटनाक्रमानंतर अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ नोंदली गेली.
या समूहातील कंपन्यांच्या शेअरचा भाव सोमवारी 11% पर्यंत वाढला. यामुळे अदानी समूहाचे बाजार मूल्य एकाच दिवसात 13.13 लाख कोटी रुपयांनी वाढले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील चौकशी अधिकार्यांनी अदानी समूहातील काही अधिकार्यांनी भारतातील काही राज्यातील अधिकार्यांना वीजपुरवठाचे कंत्राट मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप केला होता आणि अशा परिस्थितीत या समूहाला अमेरिकेतून भांडवल निर्मिती करता येणार नाही असे सांगितले होते.
त्यानंतर हे प्रकरण अमेरिकेतील एका न्यायालयात गेले होते. अदानी यांनी वेळोवेळी या आरोपाचा इन्कार केला होता. मात्र त्यानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. नंतर ही झीज बर्याच प्रमाणात भरून निघाली आहे. आता हे आरोप न्यायालयात रद्द केले जावे यासाठी हा समूह प्रयत्न करत आहे. व्हाईट हाऊस मधील काही अधिकार्यांबरोबर अदानी समूहातील अधिकार्यांनी या संदर्भात चर्चा केली असल्याचे समजले जाते.
भारत आणि अमेरिकेचे राजकीय संबंध डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अधिक चांगले झाले आहेत. त्यामुळे अदानी समूहाविरुद्धचे आरोप रद्द केले जाऊ शकतील असे वाटणार्या गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे या शेअरचा भाव वाढला. आरोप दाखल झाल्यानंतर अदानी समूहाने कायदेशीर लढा लढण्याचा संकल्प जाहीर केला होता. शेअर बाजारातही आज सकारात्मक वातावरण होते. त्यामुळे मुख्य निर्देशांकात अर्धा टक्के वाढ झाली. यामुळेही या समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.





