आता काय म्हणावं??? जरांगेंचे समर्थन मिळवण्यासाठी चक्क अपक्ष उमेदवाराने स्वत:ची कार जाळली

Nanded News | विधानसभा निवडणूकीसाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील मैदानात उतरले आहे. त्यांनी काही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. मनोज जरांगे हे मराठवाड्यातील अनेक जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठवाड्यातील मतदारसंघ निवडले आहेत.
यामध्ये बीड, परतूर, फुलंब्री, पाथरी यासारख्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे समर्थक उमेदवाराने स्वत:च्याच गाडीवर डिझेल टाकत ती विरोधकांनी जाळल्याचा बनाव केल्याची घटना घडली आहे.
मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठीच आपण हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत त्यांनी कबुल केले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच जरांगे पाटील यांचं समर्थन मिळण्यासाठी उमेदवाराने हा बनाव केल्याची चर्चा आहे. कंधार तालुक्यातील करतळा येथील परसराम कदम यांनी मुखेड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे
शनिवार २ नोव्हेंबर रोजी रात्री सवा सहा वाजेच्या सुमारास मुखेड ते बाऱ्हाळी रोड परसराम दत्ता कदम यांनी पुतण्या अक्षय लहू कदम याच्या मदतीने स्वतः जवळील असलेली टाटा सफारी गाडी डिझेल टाकून जाळली. त्यानंतर काका पुतण्याने मुखेड पोलिसांना फोन करून आमची गाडी अज्ञाताने जाळली अशी माहिती दिली.
मात्र तपासादरम्यान संशय आल्याने पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पुतण्या अक्षय कदम याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्या दोघांचा बनाव उघडकीस आला. निवडणुकीत प्रसिद्धीसाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली काका पुतण्याने दिली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुखेड पोलिसांनी अपक्ष उमेदवार परसराम कदम आणि त्याचा पुतण्या अक्षय कदम या दोघांविरोधात खोटी माहिती देणे, सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवितास धोका आणि वाहनांस धोका निर्माण होईल असे कृत्य करणे याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




