भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत किती टक्के आहे?

पृथ्वीच्या पाठीवरील लोकसंख्या गेल्या काही दशकांमध्ये वेगाने वाढत आहे आणि 2050 पर्यंत पृथ्वीच्या पाठीवरील लोकसंख्या 9.7 अब्ज एवढी होईल, असा अंदाज आहे. ११ जुलै रोजी जगभरात सगळीकडे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. तसेच हा दिवस गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजनाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. लोकसंख्या विस्फोट, कुटुंब नियोजन, लैंगिक समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क इत्यादी महत्वाच्या विषयांकडे लक्ष केंद्रित केले जाते.
असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, की पृथ्वीच्या पाठीवरील लोकसंख्या एक अब्जापर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो वर्ष जावी लागतील. मात्र गेल्या 200 वर्षातच पृथ्वीच्या पाठीवरील लोकसंख्येमध्ये सात पटीने वाढ झालेली आहे. 2011 मध्ये पृथ्वीच्या पाठीवरील लोकसंख्या सात अब्जापर्यंत पोहोचलेली होती आणि 2030 पर्यंत ती 8.5 अब्जापर्यंत पोहोचेल असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्राच्या अभ्यासानुसार 2050 पर्यंत लोकसंख्या 9.7 अब्ज आणि 2100 पर्यंत पृथ्वीच्या पाठीवरील लोकसंख्या 10.9 अब्ज एवढी झालेली असेल.
लोकसंख्या वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे माणसाचे आयुर्मान वाढलेले आहे. त्याचबरोबर प्रजननाच्या दरामध्ये ही बदल झालेले आहेत. नागरीकरण, लोकांचे स्थलांतर, नोकरी व्यवसायाच्या संधी, जगण्यासाठीची तीव्र स्पर्धा या सगळ्याचा परिणाम लोकसंख्येवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसतो. येणाऱ्या पिढ्यांना आर्थिक विकास, रोजगार, संपत्तीचे वाटप, दारिद्र्य आणि सामाजिक कल्याण या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे असे दिसते.
पृथ्वीच्या पाठीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचा विचार केला तर भारतात सर्वाधिक लोकसंख्या राहते. चीनच्या तुलनेत भारतातील लोकसंख्या किंचितशी जास्त आहे. 2023 च्या युनायटेड नेशन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या म्हणजेच युएनएफपीए च्या स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्टनुसार भारताची लोकसंख्या सुमारे 142.86 कोटी एवढी आहे. सलग दुसऱ्या वर्षी लोकसंख्येबाबत भारत चीन पेक्षा वरचढ ठरलेला आहे. युएनएफपीए च्या अहवालानुसार भारतातील सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेतला तर त्यामध्ये वर्षाला एक टक्क्याचे जरी वाढ झाली तरी आगामी 75 वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होऊ शकते.
2022 च्या नोव्हेंबर मध्ये जगाची लोकसंख्या आठ अब्ज एवढी होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1950 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 2.5 अब्ज होती. जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकसंख्या असलेले दोन देश म्हणजे चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये एक अब्जापेक्षा जास्त लोक राहतात. जगाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता हा आकडा 18% इतका होतो.
आकडेवारीनुसार, 1951 मध्ये एका महिलेने सरासरी 5 मुलांना जन्म दिला. आता 2021 मध्ये हा आकडा 2.5 वर आला आहे. गेल्या 70 वर्षांत जन्मदर निम्म्यावर आला आहे. त्यामुळे आता प्रश्न पडतो की जन्मदर निम्मा असतानाही जगाची लोकसंख्या एवढ्या वेगाने कशी वाढली?
खरं तर, जन्मदर हा लोकसंख्येच्या अर्ध्याच गोष्टी सांगतो. जेव्हा आपण मृत्यू दर पाहतो तेव्हा आपल्याला असे आढळून येते की आता दरवर्षी 1000 लोकांपैकी 7.60 लोकांचा मृत्यू होतो, तर 1000 लोकांमध्ये दरवर्षी सुमारे 18 लोकांचा जन्म होतो. म्हणजे जन्मदराचा आकडा मृत्यूदराच्या 2 पट जास्त आहे. लोकसंख्या वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.


