‘राष्ट्रद्रोह’ म्हणजे काय असतंय? अमोल शिंदेच्या आईचा एटीएस टीमला प्रश्न

लातूर – तुमच्या मुलावर सरकारने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे, असे सांगताच राष्ट्रद्रोह म्हणजे काय असतंय…? असा भाबडा सवाल संसदेत स्मोक कँडल पेटवणाऱ्या अमोल शिंदेच्या आईने केला आहे. माझ्या मुलासोबत नेमके काय सुरू आहे आम्हाला कोणीच सांगत नाही. मला माझ्या मुलाची भेट घालून द्या, अन्यथा आम्ही जीव देऊ अशी हतबलता अमोलची आई केशराबाई शिंदे यांनी एटीएस टीमसमोर व्यक्त केली.
चाकूर तालुक्यातील झरी (बु) येथे अमोल शिंदेच्या घरात तपास यंत्रणांची रांग लागलेली आहे. दरम्यान, आईवडील निरक्षर आहे. यामुळे राष्ट्रद्राेह कशाला म्हणतात, संसदेवरील हल्ला करण्याचे परिणाम काय होतात या सर्व बाबींपासून अमोलचे कुटुंबीय कोसो दूर आहेत.
या गुन्ह्यातील तपासकामी एनआयए(नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, भारत सरकार) लक्ष घातले आहे. त्यामुळे झरी (बु) येथे दिल्ली येथून ‘एनआयए’चे पथक येणार, अशी माहिती एटीएसला मिळाल्यामुळे मध्यरात्री २ वाजेपर्यंत एटीएसचे पथक झरी येथे ताटकळत बसले होते. परंतु, रात्री उशिरा या पथकाचा दौरा पुढे गेल्याची माहिती मिळताच एटीएस परत फिरले.
अमोल शिंदे याच्या मोबाइलचा डाटा तपास यंत्रणांनी काढला असून त्याची यादी एटीएसकडे पोहोचली आहे. या डेटानुसार अमोलच्या संपर्कात ८ नंबर ट्रेस करण्यात आले असून हे नंबर परराज्यांतील आहेत. अमोलच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी करण्याचे काम एटीएस करत आहे. हा आकडा शनिवारी सायंकाळपर्यंत ७० वर पोहोचला आहे.





