Satara News : महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर घालणार बंदी, महेश शिंदे यांची लक्षवेधी

कोरेगाव : कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त आहे. कृत्रिम फुलांमुळे नागरिकांचे आरोग्य, शेतकर्यांचे अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असल्याने, या फुलांची निर्मिती आणि आयातीवर राज्यात बंदी घालण्याची आ. महेश शिंदे यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी दुपारी विधानसभेत जाहीर केले.
गेल्या काही काळापासून प्लॅस्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढल्याने, फुलशेती धोक्यात आली आहे. या फुलांची निर्मिती, आयातीवर राज्य सरकारने बंदी घालावी, अशी लक्षवेधी सूचना आ. महेश शिंदे यांनी विधानसभेत मांडली होती.
याचे पडसाद राज्यभरात उमटले. सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी मंगळवारी (दि. 15) मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माझी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा झाली असून, त्यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर करावा, अशी मागणी करत आ. शिंदे यांनी हा विषय बुधवारी पुन्हा सभागृहात उपस्थित केला होता. राज्यात येणारी कृत्रिम फुले रिसायकल्ड प्लॅस्टिकपासून तयार केलेली असतात. त्यांचे आकर्षक रंग मेटॉनिक ऑक्साइडपासून केले जातात. या फुलांमुळे रक्ताचा किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, अशी भीती अमेरिकेतील संस्थेने व्यक्त केली आहे.
या फुलांच्या सान्निध्यात येणार्या नागरिकांच्या रक्तात ऑक्साइडमधील घटक मिसळून, कॅन्सरची शक्यता अधिक असते. या फुलांवर परदेशात बंदी असतानाही आपल्याकडे आयात होत आहे. फुलशेतीमधून मधमाशा पालन केले जाते. त्यामुळे परागीकरण आणि जैवविविधतेचे संरक्षण होते. फुलशेती नष्ट झाल्यास, कृत्रिम परागीकरण करायला लागेल.
कृत्रिम परागीकरणामुळे पुन्हा रसायनांचा प्रसार होऊन, कॅन्सर होण्याची शक्यता वाढणार. त्यामुळे कृत्रिम फुलांची आयात आणि निर्मितीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी आ. शिंदे यांनी केली. त्यावर, राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा अधिकृत निर्णय या आठवड्यात जाहीर केला जाईल, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
शेतकरी हित जोपासणारा आमदार
आमदार महेश शिंदे हे निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेतात. समाजकारण आणि राजकारणात त्यांनी सातत्याने विषमुक्त शेती, पंचमहाभूतांचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. कृत्रिम फुलांबाबत विधिमंडळात आवाज उठवून, त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले.
फुलशेती करणार्या शेतकर्यांच्या जीवनमरणाच्या या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधल्याने, राज्य सरकारने गांभीर्य दाखवले. आम्ही मुंबईत दाखल झाल्याचे समजताच आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, आम्हाला न्याय मिळवून दिला आहे. आमचे हित जोपासणारा आमदार लाभला आहे, असे गौरवोद्गार जिल्ह्यातील शेतकर्यांनी काढले.





