Nagar | आगामी विधानसभेसाठी प्रशासनाने कसली कंबर

नगर, (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसोबत जिल्हा प्रशासनाने ही कंबर कसली आहे. येत्या २७ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार गुरूवार (दि.१) पासून जिल्हा निवडणूक विभागाने नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आवश्यक असणार्या मतदान यंत्रणाची प्रथमस्तरीय तपासणी सुरू केली आहे. येत्या ४० दिवसात ही तपासणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे खा. नीलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केलेला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर केेंद्रीय निवडणूक आयोगाने विहीत पध्दतीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनानूसार डॉ. विखे पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील 40 मतदान केंद्रातील मतमोजणीची पडताळणी व्हावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सशुल्क अर्ज केला आहे. तसेच याप्रकरणी न्यायालयात देखील धाव घेतलेली आहे.
यामुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघात वापरलेली मतदान यंत्रे वगळून शिर्डी लोकसभा मतदारसंघासह नाशिकवरून मतदान यंत्रणाची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकहून ४ हजार ४३५ मतदान यंत्रेण उपलब्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
गुरूवारी सकाळी नगर एमआयडीसीच्या वाखर महामंडळाच्या गोडावूनमध्ये राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, प्र. उपजिल्हाधिकारी निवडणूक शाहुराज मोरे, उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख,
प्रदीप पाटील यांच्यासह तहसीलदार शंकर रोडे यांच्यास निवडणूक विभागाच्या कर्मचारी यांच्या देखरेखेखाली शिर्डी लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रणाची तपासणी सुरू करण्यात आली. नगर जिल्ह्यात बेल कंपनीने मतदान यंत्राचा पुरवठा केला असून या कंपनीचे इंजिनिअर देखील यावेळी उपस्थित होते.
येत्या १० सप्टेंबरपर्यंत नगर जिल्ह्यात आवश्यक असणार्या १२ विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणार्या आणि अतिरिक्त ठरवून दिलेल्या राखीव कोठ्यानूसार मतदार यंत्रे तपासून निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे.
नाशिकवरून मिळणारे यंत्रे
जिल्ह्यात प्रत्यक्षात आवश्यक अशी २ हजार ७९३ बीयू, १ हजार २८४ सीयू आणि १ हजार ३५८ व्हीव्ही पट अशी जवळपास ४ हजार ४३५ यंत्रे ही नाशिकवरून उपलब्ध होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. पुढील ४० दिवस म्हणजेच १० सप्टेंबरपर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रणांची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.





