पुणे | शास्त्रांमध्ये अस्पृश्यता नसतानाही भेदाभेद कशासाठी?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शास्त्रांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नाही. मग समाजात भेदाभेद अमंगळ कशासाठी? वेदांची भूमी असलेला भारत भाषा आणि पूजा पद्धतीच्या विविधतेने नटलेला आहे. आपले अस्तित्व वेगवेगळे दिसत असले, तरी आपण सर्व एकमेकांना बांधलेलो आहोत.
खरे तर ही विविधता नसून, एकाच सत्याची अभिव्यक्ती आहे. सर्व जगाला सुख देण्यासाठी आपले राष्ट्रजीवन आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि श्री सदगुरू ग्रुप यांच्यातर्फे आयोजित वेदसेवक सन्मान सोहळ्याला डॉ. भागवत उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज,चंपतराय बन्सल,
भारत विकास ग्रुपचे संस्थापक डॉ. हणमंतराव गायकवाड आणि उद्योजक अभिजीत पवार, सद्गुरू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे. समाजात अनास्था वाढली आहे.
कलहाची आग लावून, स्वार्थाची पोळी भाजण्याऱ्या मधांद शक्ती भारतात आल्या असून, आपल्या ज्ञानातूनच त्याची उत्तरक्रिया करावी लागेल.
त्यासाठी आपले स्व ज्ञान जागृत करत, परंपरा आणि संविधानाचे अनुशासन पाळले पाहिजे, असे डॉ. भागवत यांनी नमूद केले. गोविंददेवगिरी यांचेही भाषण झाले. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.




