जगातील नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात वाढ, नक्की कारण काय? जाणून घ्या

Average Life Expectancy : 1950 नंतर इंडोनेशियातील नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात लक्षणीय वाढ झालेली आहे 1950 मधील तेथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 39.4 एवढेच होते. आता ते 71.1 वर पोहोचलेले आहे 2050 पर्यंत ते 74.7 वर्षांवर जाईल असा अंदाज आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट अर्थात ओईसीडीचे सभासद असलेल्या 38 देशांमध्ये प्रति व्यक्ती आरोग्यावरील खर्चामध्ये इंडोनेशिया 37 व्या स्थानावर आहे.
फिलिपाईन्स या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान सध्या 72.3 वर्षे एवढे आहे. 1950 मध्ये ते 53.6 वर्षे होते. नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढण्यामागील कारणे सांगताना फिलिपाईन्सच्या कमिशन ऑन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट अर्थात सीपीडीच्या अहवालात म्हटले आहे, की आरोग्य क्षेत्रातील सुधारणा, वैद्यकीय अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि व्यापक प्रमाणावर जेनेरिक औषधांची उपलब्धता तसेच चांगल्या जीवनशैलीची निवड करण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली जागरूकता यामुळे आयुर्मान वाढण्यास हातभार लागलेला आहे. 2050 पर्यंत या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 75.4 वर्षांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत.
भारतात 1950 पासून नागरिकांच्या सरासरी आयुर्माना चांगलीच वाढ झालेली आहे 1950 साली भारतातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान केवळ 41.7 वर्षे होते. आता नागरिक सरासरी 72 वर्षे जगतात आणि २०५० पर्यंत नागरिकांचे सरासरी आयुर्मान 77.9 वर्षांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती तसेच व्यापक प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध होणे, पोषक खाद्यपदार्थांची उपलब्धता आणि सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेली व्यवस्था यामुळे नागरिकांच्या आयुर्मानात वाढ होताना दिसत आहे. असे असले तरी अद्यापही आदिवासी आणि दलित वर्गातील लोकांपर्यंत तुलनेत या सुविधा पोहोचण्यास दिरंगाई होताना दिसत आहे.
रशियाचे सरासरी आयुर्मान सध्या 74.6 वर्ष आहे. मात्र रशियातील महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात असे दिसून आलेले आहे. रशियामध्ये स्त्रियांचे सरासरी आयुर्मान 79.3 वर्षे असून त्या तुलनेत पुरुषांचे सरासरी आयुर्मान 69.5 वर्षे आहे. रशियातील एकंदरीत नागरिकांचे आयुर्मान 2050 पर्यंत 78.7 वर्षांवर जाईल अशी चिन्हे आहेत.
मेक्सिको मधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 2050 पर्यंत 80 च्या वर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सध्या तेथील नागरिकांचे आयुर्मान 75 वर्षे आहे. 1950 मध्ये हाच आकडा 44 एवढा होता. लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा तसेच आरोग्य सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे नागरिकांच्या आयुर्मानात वाढ झाल्याचे दिसून येते.
ब्राझील मधील नागरिकांच्या आयुर्मानात गेल्या 75 वर्षात लक्षणीय सुधारणा झालेली आहे. 1950 मध्ये देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 48.1 वर्ष एवढे होते. आता ते 76.2 वर पोहोचलेले असून 2050 पर्यंत हा आकडा 81.3 वर्षे एवढा होईल.
सौदी अरेबियातील नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात 1950 पासून दुपटीने वाढ झालेली आहे. 1950 मध्ये येथील नागरिकांचे आयुर्मान 41 वर्षे होते. आता ते 78.1 वर्षांवर पोहोचले असून 2050 पर्यंत ते 82.9 वर्षांवर पोहोचेल. तेलामुळे आलेली विपुल संपन्नता आणि देशात प्रत्येक नागरिकाला गेली अनेक दशके वैद्यकीय उपचार मोफत पुरवण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आयुर्मानात लक्षणीय वाढ झालेली आहे.
अमेरिकेतील नागरिकांचे सध्या सरासरी आयुर्मान 79.7 वर्षे आहे आणि 2050 पर्यंत ते 83.7 वर्षांवर पोहोचेल असा अंदाज आहे. 1950 मधील मध्ये या देशातील नागरिकांचे आयुर्मान 68.1 वर्ष होते .मात्र अन्य उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत अमेरिकेतील आयुर्मानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत नाही. त्यामागे माता आणि अर्भकांच्या मृत्यूचा दर जास्त असल्याने सरासरी आयुर्मानात मोठी वाढ दिसत नाही. त्याबरोबरच तरुण वयातही मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण अमेरिकेत अधिक आहे.



