Nepal Gen Z movement: नेपाळमधील ‘जेन झी’ आंदोलनातील मृतांचा आकडा वाढला, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

काठमांडू: नेपाळची राजधानी काठमांडू येथे सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करणारे तरुण आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील बहुतेक जखमींना न्यू बनेश्वर येथील सिव्हिल सर्व्हंट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयाचे कार्यकारी संचालक मोहन चंद्र रेग्मी यांनी माध्यमांना सांगितले की, किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बद्री रिजाल यांच्या मते, दोन जणांना मृतावस्थेत ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. स्थानिक पत्रकारांनी सांगितले की, “किमान दीडशे जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू आहे, लष्कर रस्त्यावर उतरले आहे, आणि तीव्र चकमकी झाल्या आहेत. तरीही निदर्शनकर्ते माघार घेत नाहीत आणि मृत्यूच्या बातम्यांनंतरही आंदोलन सुरू आहे.”
संचारबंदी आणि लष्कर तैनात –
प्रशासनाने अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. स्वतःला ‘जेन झी’ अर्थात नवीन पिढी म्हणवणारे निदर्शनकर्ते व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित करत आहेत. सोमवारी सकाळी हजारो निदर्शनकर्ते काठमांडूच्या सिंह दरबार येथे जमले आणि नंतर न्यू बनेश्वर येथील संसद भवनाकडे निघाले. काही निदर्शनकर्त्यांनी अडथळे तोडून संसद भवन परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चकमकी झाल्या आणि पोलिसांनी बळाचा वापर केला.
राष्ट्रपती भवन, शीतल निवास, नारायण दरबार संग्रहालय, पंतप्रधान निवास आणि संसद भवन परिसरात रात्री 10 वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, निदर्शनकर्ते अराजक बनले असून नियमांचा भंग करत आहेत. संचारबंदी वाढवण्याची घोषणा होताच नेपाळ लष्कराच्या तुकड्या रस्त्यावर तैनात करण्यात आल्या. नेपाळ लष्कराचे प्रवक्ता सहायक जनरल राजाराम बसनेत म्हणाले, “लिखित आदेशानंतर शांतता राखण्यासाठी एक छोटा लष्करी ताफा पाठवण्यात आला आहे.”
निदर्शनांचे कारण आणि भ्रष्टाचाराविरोधातील नारे –
नेपाळ सरकारने मागील आठवड्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यासह 26 सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. सरकारने या कंपन्यांना स्थानिक कायद्यांचे पालन, स्थानिक कार्यालय उघडणे आणि तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला होता.
चिनी सोशल मीडिया कंपनी टिकटॉकने या अटींचे पालन केल्याने त्यावर बंदी लागली नाही. नेपाळमधील मोठ्या संख्येने नागरिक परदेशात राहतात. सोशल मीडियावरील बंदीमुळे त्यांना कुटुंबियांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. या बंदीविरोधात तरुणांनी निदर्शनांचे आवाहन केले. सध्या नेपाळमध्ये टिकटॉक कार्यरत असून, आयोजकांनी यावर व्हिडिओ शेअर करत तरुणांना निदर्शनांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
टिकटॉकवर ‘नेपो बेबी’ हा ट्रेंड सुरू झाला, ज्यामध्ये नेत्यांच्या मुलांच्या सुखासीन जीवनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत नेते देशासाठी काम करत नसल्याचा आरोप करण्यात आला. अनेक व्हिडिओमध्ये नेपाळच्या दुर्गम भागातील लोकांचे कठीण जीवन आणि नेत्यांच्या सुखी जीवनाची तुलना दाखवण्यात आली.
पोलिसांकडून देशभरात सतर्कता –
नेपाळ पोलिस केवळ काठमांडूमध्येच नव्हे, तर देशाच्या अनेक भागांत निगरानी ठेवत आहेत. पोलिस प्रवक्ता बिनोद घिमिरे यांनी सांगितले, “काठमांडूसह अनेक प्रमुख शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. शांतता राखण्यासाठी सर्व बाजूंनी योजना आखून पोलिस तैनात करण्यात आले आहेत.”
निदर्शनांमध्ये सहभागी एका विद्यार्थिनीच्या हातातील फलकावर लिहिले होते, “भूकंपाची गरज नाही, नेपाळ दररोज भ्रष्टाचाराने हादरते.” यापूर्वी काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापनेसाठीही आंदोलन झाले होते, ज्यामध्येही भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
आंदोलनाचे प्रमुख कारण –
नेपाळमध्ये 4 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूबसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली, कारण ते नोंदणीकृत नव्हते. ही बंदी तरुणांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षण आणि व्यवसायावरून असह्य झाली. याशिवाय, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे असंतोष वाढला. राजकीय नेत्यांच्या मुलांचा ऐशोआराम जीवनशैली दाखवणारे व्हिडिओ व्हायरल होत असताना, सामान्य तरुणांची दयनीय स्थिती उघडकीस आली. 8 सप्टेंबरला काठमांडूत हजारो जेन-झेड तरुण रस्त्यावर उतरले, संसदेत घुसले. पोलिसांशी संघर्षात 10 हून अधिक मृत्यू, 80 जखमी. कर्फ्यू लावण्यात आला. हे आंदोलन भ्रष्टाचारमुक्त आणि डिजिटल स्वातंत्र्याची मागणी करत आहे.




