Vaishnavi Hagavane death case:….त्यांनी सुनेसोबत वाईट वर्तन केलं तर माझा काय दोष? अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar : महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संतापची लाट उसळली आहे. सुनेचा छळ करण्यात आल्याचा आरोप हगवणे कुटुंबातील सदस्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, वैष्णवीचे सासरे आणि दीर यांचा शोध पोलिस घेत आहेत. वैष्णवी आणि शशांक यांच्या शाही विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये एका फोटोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फॅार्च्युनर गाडीची चावी देतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. याविषयी अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.
मी लग्नाला गेलो, गाडीची चावी द्यायला सांगितली होती. मी देताना विचारलंही होतं. पण त्यांनी सुनेसोबत वाईट वर्तन केलं तर माझा काय दोष? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. ते बारामती येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अजित पवार यांच्या वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नातील उपस्थितीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.
आता कुणाच्या लग्नाला नाही गेलो तर अशी आफत येते. त्यामुळे कुणी लग्नाला न आलं तर नाराज होऊ नये, असेही ते म्हणाले. नालायक लोक माझ्या पक्षात नसतात. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही अजित पवारांनी म्हणाले. फरार आरोपींसाठी पोलिसांची तीन विशेष पोलीस पथके त्यांच्या शोधासाठी रवाना केली आहेत. जिथे असेल तिथून मुसक्या घालून आणा असा स्पष्ट आदेश पोलिसांना दिल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. माझ्या जवळचा असला तरी मी सांगेन, टायरमध्ये टाका. असली माणसे माझ्या पक्षात नकोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र हगवण यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवे खुलास होत असून माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याचे समोर येत आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेंद्र हगवणे यांच्यावर बडतर्फची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.





