ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात नेमका काय वाद झाला? 10 मुद्यांमध्ये सर्वकाही जाणून घ्या

वॉशिंग्टन: शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काय घडले ते संपूर्ण जगाने थेट पाहिले. रशिया-युक्रेन युद्धावर ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले होते. पण दोन नेत्यांमध्ये असे काही घडले जे इतिहास कधीही विसरणार नाही. उभय नेत्यांमधील भेटीची सुरुवात नक्कीच औपचारिक भेटीने झाली पण ती अपेक्षेप्रमाणे अजिबात संपली नाही.
ट्रम्प आणि झेलेन्स्की (व्होलोडिमिर झेलेन्स्की) यांच्यात शांततेत सुरू झालेले संभाषण लगेच गरमागरम वादविवादात बदलले. दोघांमधील वाद वाढत असताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हॅन्स यांनी आपला सूर आणखी कडक केला आणि झेलेन्स्कीला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण झेलेन्स्की थांबले नाहीत त्यांनीही त्याच पद्धतीने प्रतिवाद केला. व्हाईट हाऊसमध्ये काय घडले ते सविस्तर जाणून घ्या.
– शुक्रवारी जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला आले तेव्हा संपूर्ण जगाला अपेक्षा होती की ते आपली भूमिका सोडून युद्ध संपवण्याच्या दिशेने वाटचाल करतील, पण घडले उलटेच. कॅमेऱ्यासमोर दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात रशिया-युक्रेन युद्धाच्या सद्यस्थितीवर चर्चा सुरू झाली तेव्हा ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला मोठ्या आणि कठोर आवाजात सांगितले की, तुम्ही एकतर करार करा नाहीतर आम्ही बाहेर पडू.
– डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्कीला म्हणाले, “तुम्ही मोठ्या संकटात आहात, तुम्ही युद्ध जिंकत नाही आहात. यावर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली, आम्ही आमच्या देशात आहोत आणि आम्ही या वेळी मजबूत आहोत. आम्ही तुमच्या समर्थनाबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले आहेत.
– युक्रेनमध्ये शांतता कराराची आशा मध्येच लटकत असल्याचे पाहून ट्रम्प म्हणाले, मला भीती वाटते की अशा प्रकारे हाताळणे खूप कठीण होईल. तुम्ही लाखो लोकांच्या जीवनाशी जुगार खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धासोबत जुगार खेळत आहात. आणि तुम्ही जे करत आहात ते युक्रेनसाठी खुप अपमानजनक आहे.
– ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात होणाऱ्या वादविवादात अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्सही सामील झाले. जेव्हा झेलेन्स्कीने त्यांना मोठ्याने बोलू नका असे सांगितले तेव्हा वेन्स यांनी ठाम भूमिका घेतली आणि झेलेन्स्कीला सांगितले की युद्ध संपवण्यासाठी “मुत्सद्देगिरीची आवश्यकता आहे”. मात्र, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पलटवार करत म्हंटले, ‘कसली मुत्सद्देगिरी? यानंतर वन्स यांनी त्यांच्यावर राष्ट्रपती कार्यालयाचा अनादर केल्याचा आरोप केला.
– राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीवर हल्ला करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स, लष्करी उपकरणे आणि भरपूर पाठिंबा दिला आहे. जर तुमच्याकडे आमची लष्करी उपकरणे नसती, तर हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते.”
– ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देत त्यांच्यावर पुतीनसारखे शब्द बोलत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “हो-हो, आम्ही दोन-तीन दिवसही टिकू शकत नाही, मी पुतीन यांच्याकडूनही हे ऐकले आहे.” झेलेन्स्कीचे हे शब्द ऐकून ट्रम्प आश्चर्यचकित झाले. ट्रम्प म्हणाले, अशा प्रकारे काम करणे खूप कठीण जाणार आहे.
– ट्रम्प यांच्याशी जोरदार वाद झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊस सोडून गेले. झेलेन्स्की तेथे पोहोचल्यावर ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले, मात्र परत जाताना ट्रम्प त्यांना सोडायलाही गेले नाहीत. या दोघांमधील वादानंतर जगातील अनेक देशांनी विशेषतः युरोपीय देशांनी झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
– डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठकीनंतर सोशल मीडियावर झेलेन्स्कीवर टीका करताना म्हंटले की, ते (झेलेन्स्की) शांततेसाठी तयार नाहीत. झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला.
– या भेटीनंतर झेलेन्स्की यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली आणि सांगितले की, मी कोणाचीही माफी मागणार नाही. जे काही झाले ते दोन्ही देशांसाठी चांगले नाही.





