पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? कसा होणार फायदा; वाचा सविस्तर

PM Dhan Dhanya Krishi Yojana : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा आज अर्थसंकल्प सादर केला असून यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सविधा यांच्या विकासासाठी सरकारनं भरीव तरतूद केली आहे. मात्र, यावेळी केंद्रानं शेती क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसतं आहे.
अर्थमंत्र्यांनी देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात पीएम कृषी धन धान्य योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत १०० जिल्ह्यांचा सहभाग असणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेमुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार? हे जाणून घेऊ या…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी सीतारामन यांनी शेतकऱ्यांना अनेक मोठे गिफ्ट दिले आहेत. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे पीएम धन कृषी योजना?
पीएम धन कृषी योजनेअंतर्गत देशाभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे, त्यांचा या 100 जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाणार आहे. शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या काही योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर भर दिला जाईल. राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातल्या एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाणार असून सोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाणार आहे.
असा मिळणार शेतकऱ्यांना लाभ?
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित केलं जाईल. पिकाची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच उच्च गुणवत्ता असलेले बी-बियाणे तसेच कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जाईल. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाणार आहे.





