“राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय?”; सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यावरून वर्षा गायकवाडांचा सवाल

Saif Ali Khan Attack | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री त्याच्या घरात घुसलेल्या एका चोराने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर मनोरंजनासह राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचे म्हंटले आहे.
वर्षा गायकवाड यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सोबतच त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्वतःला विचारायला नको का?,” असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
‘मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली’
पुढे त्यांनी लिहिले की, “अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही. कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे.” Saif Ali Khan Attack |
“गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण? कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. वाढत्या गोळीबाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणं, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचं राजकारण वाढणं या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय?,” असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. Saif Ali Khan Attack |
हेही वाचा :





