काय सांगता..! फेसबुक-इन्स्टाप्रमाणे व्हॉट्सअॅपवरही मिळणार ‘Blue Tick’; सेटिंग्जमध्ये मिळणार नवीन पर्याय

Whatsapp Blue Tick : फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाईड अकाऊंटना ‘ब्लू’ टिक दिले जाते. ही निळी टिक विशिष्ट खाते अस्सल असल्याचे प्रमाणित करते. आता अशीच सुविधा चॅटिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’वरही उपलब्ध होणार आहे.
लवकरच व्हॉट्सॲपवरही ‘ब्लू’ टिक दिली जाणार आहे. सुरुवातीला ही ब्लू टिक ठराविक लोकांनाच दिली जाईल आणि त्यासाठी व्हॉट्सॲपच्या आवश्यक अटींची पूर्तताही करावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपच्या पुढील अपडेटमध्ये ब्लू टिक असलेले हे फीचर येणार आहे. सुरुवातीला हे फीचर फक्त व्हॉट्सॲपवर बिझनेस अकाऊंट चालवणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असेल. व्यवसाय खाते सेटिंग्जमध्ये एक नवीन पर्याय असेल ज्यावर जाऊन तुम्ही तुमचे खाते व्हेरिफाईड करू शकाल.
तुम्हाला ब्लू टिक मोफत मिळेल का?
व्हॉट्सॲपने अद्याप ही अधिकृत माहिती दिलेली नाही, त्यामुळे यासाठी पैसे मोजावे लागतील की नाही हे निश्चित नाही. तथापि, इतर प्लॅटफॉर्म पाहता, अशी चर्चा आहे की व्हॉट्सॲप यासाठी काही शुल्क देखील आकारू शकते. या संदर्भातील काही पोस्ट सोशल मीडियावर देखील व्हायरल होताना दिसत आहे.
ब्लू टिकसाठी पहिली आणि एकमेव आवश्यक अट म्हणजे तुमचे खाते हे व्यवसाय (बिझनेस) खाते असावे. तुम्हाला ब्लू टिक न मिळाल्यास, तुम्ही तुमचे बिझनेस अकाउंट पूर्वीप्रमाणे वापरू शकता.
व्हॉट्सॲपचे बिझनेस अकाऊंट सहसा ते लोक चालवतात जे याद्वारे कोणताही व्यवसाय करतात किंवा त्यांचा नंबर कोणत्या ना कोणत्या व्यवसायाशी संबंधित असतो.





