Amitesh Kumar : एकनाथ खडसेंनी पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांवर अमितेश कुमार काय म्हणाले?

Amitesh Kumar : रेव्ह पार्टीप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह सहा जणांना अटक केली आहे. आज न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. या सूनावणीपूर्वी एकनाथ खडसे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तसेच पुणे पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी शंका उपस्थित केली होती. खडसेंनी पोलिसांनी व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कुणीही शंका घेऊ नका, आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो आणि व्हिडीओ लीक केला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले अमितेश कुमार?
हे सगळे बसलेस एलिगेशन आहेत, पोलिसांची कारवाई पारदर्शकरित्या नियमानुसारहोईल. जी कारवाई झाली आहे त्याची विस्तृत माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेण्याचं कारण नाही. कुठल्याही प्रकाराची फोटो व्हिडिओ पोलिसांकडून देण्यात आले नाहीत, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
कोणी फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ काढत असतील, तर त्यावर बंधन आम्ही घालू शकत नाही. कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ट होती. आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही कारवाई केली. या कारवाईबाबत कुणीही मनात शंका घेऊ नका, कुणीही संशय घेऊ नका. आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो लीक केला नाही. कोणताही व्हिडीओ किंवा इमेजेस पोलिसांकडून लिक करण्यात आले नाहीत, असे स्पष्टीकरण अमितेश कुमार यांनी दिले आहे.
खडसेंचा खळबळजनक दावा
पुण्यातील पत्रकार परिषदेतून एकनाथ खडसे यांनी डॅा. प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, मी आयुष्यात कधीच ड्रग्स घेतलेले नाही, असे मला जावयाने सांगितल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. त्यांच्यावर पाळत ठेवली जायची साध्या वेशातील पोलीस त्यांच्यावर सतत पाळत ठेवून असायचे असा खळबळजनक दावा खडसेंनी केला आहे.





