“मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है?”; शालिनी ठाकरेंकडून सुजात आंबेडकरांना सडेतोड उत्तर

मुंबई : राज ठाकरे यांच्या मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त आधी त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावावा असे जाहीर आव्हान दिले होते. त्यांच्या या आव्हानाला आता मनसेने सडेतोड उत्तर दिले असून हे उत्तर शालिनी ठाकरे यांनी दिले आहे.
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुजात आंबेडकरांचा टीकेला उत्तर देताना एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. “सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितलं आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?,” अशी विचारणा शालिनी ठाकरे यांनी केली आहे.
मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…..!!!
सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?#RajThackeray #hanumanchalisa @mnsadhikrut @RajThackeray @SujatAmbedkar
— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 7, 2022
या अगोदर सुजात आंबेडकर यांनी, “सध्या रमजानचे दिवस आहेत. काल कोणीतरी एक वक्तव्य केलं की मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालिसा म्हणायला लावेल. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा,” असे आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिले होते.
“मला तिकडे एकही बहुजन पोरगा नको आहे. जितकी लोकं हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं, मग हनुमान चालिसा म्हणा,” असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले होते. तसेच “राज ठाकरे यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही शरद पवार यांची मुलाखत घ्या, तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम दंगलींवर उभा करू नका.” असेही सुजात आंबेडकर म्हणाले होते .





