World Pneumonia Day: मुलांमध्ये दिसणारी निमोनियाची सुरुवातीची लक्षणे कोणती? श्वास घेण्याची पद्धतही देते आजाराचे संकेत
World Pneumonia Day जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, निमोनिया हा फुफ्फुसांमध्ये होणारा संसर्ग आहे. विषाणू, जीवाणू आणि काही वेळा बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुसांमधील हवेच्या लहान पिशव्यांमध्ये म्हणजेच अल्व्हिओलाईमध्ये द्रव किंवा पू जमा होतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडचण निर्माण होते.

World Pneumonia Day: दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी जागतिक निमोनिया दिन (World Pneumonia Day) साजरा केला जातो. निमोनिया हा फुफ्फुसांशी संबंधित संसर्गजन्य आजार असून लहान मुलांसाठी तो गंभीर ठरू शकतो. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो. अनेकदा सुरुवातीला खोकला, सर्दी आणि ताप यांसारखी सामान्य लक्षणे दिसतात. त्यामुळे पालक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, मुलांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत होणारे बदलही निमोनियाचे संकेत देऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.
काय आहे निमोनिया?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, निमोनिया हा फुफ्फुसांमध्ये होणारा संसर्ग आहे. विषाणू, जीवाणू आणि काही वेळा बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुसांमधील हवेच्या लहान पिशव्यांमध्ये म्हणजेच अल्व्हिओलाईमध्ये द्रव किंवा पू जमा होतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यात अडचण निर्माण होते.
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना निमोनियाचा धोका अधिक असतो. कुपोषण, वेळेवर लसीकरण न होणे, आधीपासून असलेले आजार आणि धूर किंवा प्रदूषणाच्या संपर्कात राहणे यामुळेही हा धोका वाढू शकतो.

Pneumonia
मुलांमध्ये निमोनियाची सुरुवातीची लक्षणे कोणती?
१. सतत खोकला येणे : मुलांना वारंवार खोकला येणे हे निमोनियाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. हा खोकला हळूहळू वाढू शकतो. त्यासोबत श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
२. ताप आणि थंडी वाजणे : निमोनिया झाल्यास मुलांना ताप येऊ शकतो. काही मुलांना थंडी वाजणे किंवा अंगात हुडहुडी भरणे असे त्रासही जाणवतात. मात्र, प्रत्येक मुलाला जास्त ताप येतोच असे नाही.
३. वेगाने श्वास घेणे : हे निमोनियाचे महत्त्वाचे लक्षण आहे. मूल नेहमीपेक्षा वेगाने श्वास घेत असेल किंवा श्वास घेण्यासाठी अधिक जोर लावत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
४. छाती आतल्या बाजूला ओढली जाणे : मूल श्वास घेत असताना छातीच्या खालचा भाग किंवा बरगड्यांखालील त्वचा आतल्या बाजूला ओढली जात असल्याचे दिसू शकते. हे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे गंभीर लक्षण आहे.
५. खाण्या-पिण्यात अडचण : लहान मुले दूध पिणे कमी करतात. मोठ्या मुलांची भूक मंदावते. त्यामुळे त्यांच्या आहाराकडे आणि पाणी पिण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे.
६. सुस्ती आणि थकवा : मूल नेहमीपेक्षा जास्त झोपत असेल, खेळण्यात रस दाखवत नसेल किंवा सतत थकल्यासारखे वाटत असेल, तर हेही आजाराचे लक्षण असू शकते.
ही गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा
मुलाचे ओठ, जीभ किंवा नखे निळसर अथवा धुरकट दिसणे, श्वास घेण्यास खूप त्रास होणे, मूल धापा टाकणे, दूध किंवा पाणी पिता न येणे, सतत उलट्या होणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
मुलांना निमोनियापासून कसे वाचवाल?
वेळेवर लसीकरण : मुलांना वयानुसार आवश्यक असलेले सर्व लसीकरण करून घ्यावे. न्यूमोकोकल, एचआयबी, गोवर आणि डांग्या खोकल्यापासून संरक्षण देणाऱ्या लसी निमोनियाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
- स्तनपानाला प्राधान्य : जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध द्यावे. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
- पौष्टिक आहार : सहा महिन्यांनंतर मुलांना वयानुसार पूरक आहार द्यावा. आहारात डाळी, हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिनांचा समावेश करावा.
- स्वच्छतेची काळजी : जेवण्यापूर्वी, बाहेरून आल्यानंतर आणि खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात धुण्याची सवय मुलांना लावावी.
- धुरापासून संरक्षण : घरात किंवा घराच्या आसपास धूम्रपान करू नये. स्वयंपाकघरातील धूर बाहेर जाण्यासाठी योग्य वायुवीजनाची व्यवस्था असावी.
- स्वच्छ आणि मोकळी हवा : मुलांना धूर, धूळ आणि प्रदूषणापासून शक्यतो दूर ठेवावे. घरातील हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
निमोनियाची लक्षणे सुरुवातीला सामान्य वाटू शकतात. मात्र, मुलांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत बदल, छाती आत ओढली जाणे किंवा असामान्य सुस्ती दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास मुलांना या आजारातून बरे होण्यास मदत होते.





