विशाखापट्टणम :- ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क ,सीन एबॉट आणि नॅथन एलिस या वेगवान गोलंदाजाच्या माऱ्यापुढे टीम इंडियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. भारतीय फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विखुरताना दिसली आणि टीम इंडिया 26 षटकांत अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान मिळालं आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलनं नाबाद 29 धावा केल्या.
What a bowling performance from Australia! ✨
India are all out for 117! #INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/5ISBBNMhiZ pic.twitter.com/bfWB2MMDQE
— ICC (@ICC) March 19, 2023
सामन्यात सर्वात आधी टाॅस जिंकत ऑस्ट्रेलियन संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची शीर्ष फळी या सामन्यातही अपयशी ठरली. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर 83 धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात एकूण 49 धावांवर भारतीय संघाच्या पाच विकेट पडल्या.
स्टार्कने पहिल्याच षटकात शुभमन गिलला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शुभमन मागील सामन्यात जसा आऊट झाला होता त्याच पद्धतीने तो बाद झाला. यानंतर डावाच्या पाचव्या षटकात स्टार्कने कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टार्कने रोहितला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. रोहितला 15 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 13 धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव एलबीडब्ल्यू आऊट झाला. याआधीच्या सामन्यात जसा आऊट झाला होता तसाच सूर्याही बाद झाला. सूर्याला सलग दुसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही.
यानंतर केएल राहुल मिशेल स्टार्कचा पुढचा बळी ठरला. राहुलला 12 चेंडूत 9 धावा करता आल्या. स्टार्कने राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले. शॉन अॅबॉटने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने हार्दिक पांड्याला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. हार्दिकला एक धाव काढता आली. भारताला 16व्या षटकात सहावा धक्का बसला. विराट कोहली 35 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले.
91 धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला 39 चेंडूत 16 धावा करता आल्या. 103 धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला हेडकरवी झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत चार धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. शमीला खातेही उघडता आले नाही. यानतंर स्टार्कने सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव 117 धावांत गुंडाळला.
भारताचे एकूण सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. यातील चार फलंदाज शून्यावर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 5 तर अॅबॉटने तीन आणि नॅथन एलिसने दोन गडी बाद केले.