वेस्ट इंडिजच्या होल्डरची क्रमवारीत प्रगती

दुबई – आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने प्रगती केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी केल्यामुळे तो तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे.
करोनामुळे ठप्प झालेले जागतिक क्रिकेट गेल्या आठवड्यात या दोन संघांतील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याने सुरू झाले. हा सामना वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करत जिंकला.
होल्डरने दुसऱ्या क्रमांकावर येताना न्यूझीलंडच्या नेल वॅगनरला मागे टाकले.
या क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराहला मात्र, सातव्या स्थानावरच समाधान मानावे लागत आहे. करोनाचा धोका भारतात कायम असल्याने अद्याप कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटला प्रारंभ झालेला नसल्याने बुमराहच्या क्रमात बदल झालेला नाही. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीतील विजयामुळे 40 गुण मिळवत खाते उघडले आहे.





