West Indies Record : हैदराबादच्या नव्या पिचवर कॅरेबियन वादळ! होप-हेटमायरच्या टोलेबाजीने मोडला १० वर्षे जुना विक्रम
West Indies Record : या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शाई होपच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर २४७ धावांचा डोंगर उभारला. मात्र, तत्पूर्वी एका खास विक्रमाला गवसनी घातली

West Indies Break 10-Year-Old Powerplay Record Against India Hyderabad IND vs WI 4th T20I : भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघासाठी कर्णधार शाई होपने आपल्या दमदार फलंदाजीने सातत्यपूर्ण कामगिरीचा नवा आदर्श उभा केला आहे. एकदिवसीय मालिकेत दोन शतके झळकावल्यानंतर त्याने चालू टी-२० मालिकेतही भारतीय गोलंदाजांवर आपला दरारा कायम ठेवला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नव्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना चौफेर टोलेबाजी केली. शाई होप आणि ज्वेल अँड्र्यू यांनी डावाची सुरुवात तुफानी करत अवघ्या ४.२ षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
१० वर्षे जुना विक्रम मोडीत; पॉवरप्लेमध्ये कुटल्या ७९ धावा –
ज्वेल अँड्र्यूनंतर मैदानात उतरलेल्या शिमरॉन हेटमायरने अवघ्या १२ चेंडूंत ३३ धावा ठोकत भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली. दुसऱ्या टोकाला शाई होपनेही आक्रमक पवित्रा घेतला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांत १ बाद तब्बल ७९ धावा फटकावल्या. यासह विंडीजने २०१६ मध्ये भारताविरुद्ध केलेल्या ७८ धावांचा स्वतःचाच १० वर्षे जुना विक्रम मोडला, तसेच भारताविरुद्ध पॉवरप्लेमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक धावा करण्याच्या न्यूझीलंडच्या ७९/१ या विक्रमाशी बरोबरी साधली.
भारताविरुद्ध सर्वात जलद १०० धावांची बरोबरी –
पॉवरप्ले संपल्यानंतरही विंडीजच्या फलंदाजांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. अवघ्या ७.४ षटकांत वेस्ट इंडिजने १०० धावांचा पल्ला गाठला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताविरुद्ध सर्वात जलद १०० धावा करण्याच्या २०१६ मधील आपल्याच ऐतिहासिक विक्रमाची विंडीजने यावेळी बरोबरी केली.
२८ चेंडूंत कर्णधार होपचे वादळी अर्धशतक –
१०० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर लगेचच कर्णधार शाई होपने उत्तुंग षटकार खेचत अवघ्या २८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्याने ५० हून अधिक धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली. त्याच्या या भक्कम पायाभरणीमुळे विंडीजने सामन्यात भारतीय संघावर सुरुवातीपासूनच प्रचंड दबाव निर्माण केला.





