West bengal | पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांच्या राजकारण्यांच्या घरांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबताना दिसत नाही. भाजप नेते, बराकपूरचे माजी लोकसभा खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर गोळीबार व बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. यापूर्वीही त्यांच्या घरावर असे हल्ले झाले असून २०२१ मध्ये दोनदा हल्ला झाल्याची नोंद आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अर्जुन सिंह यांच्या घरावर आज सकाळी बाईकस्वार गुंडांनी हल्ला करत अचानक बॉम्बफेक सुरू केली. यावेळी हल्लेखोरांकडून गोळीबारही करण्यात आला आहे. बॉम्बचा आवाज ऐकून माजी खासदार जेव्हा घराबाहेर पडले असता बॉम्बचा तुकडा त्यांच्या पायावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. सध्या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
स्थानिक नगरसेवकाचा मुलगा आरोपी
अर्जुन सिंह यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक सोमनाथ श्याम यांचा मुलगा या घटनेला जबाबदार आहे. नमित सिंग असे त्याचे नाव आहे. माझ्या घरावर 15-20 हल्लेखोरांनी हल्ला केला. माझ्या सुरक्षा रक्षकांवरही हल्ला करण्यात आला. नवरात्रीची पूजा चालू होती. मी तिथे होतो. अचानक झालेला आवाज ऐकून मी खाली गेलो. गोळ्या झाडल्या गेल्या, इतक्यात बॉम्बचा एक मोठा तुकडा येऊन माझ्या पायाला लागला. हे सर्व घडत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. यापूर्वीही गुंडांनी आमच्यावर हल्ला केला होता.
या हल्ल्याबाबत अर्जुन सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला करत आपली बाजू मंडळी आहे, “आज सकाळी सर्वजण नवरात्रीच्या पूजेत व्यस्त असताना एनआयए प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते नमित सिंग या स्थानिक नगरसेवकाचा मुलगा नमित सिंग यांच्या संरक्षणाखाली आणि स्थानिक पोलिस, निगराणीखाली, अनेक जिहादी आणि गुंडांनी माझ्या कार्यालयासह मजदूर भवनावर हल्ला केला.’ दरम्यान, सोमनाथ श्याम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.