West Asia conflict-Dry fruit trade: इराण युद्धाचा थेट फटका तुमच्या स्वयंपाकघराला! पिस्ता, केशर, खजूर महागले; पुढे आणखी संकट?
West Asia conflict-Dry fruit trade: पुरवठा साखळी तुटण्याचा धोका लक्षात घेता, सर्वसामान्यांच्या खिशावर येत्या काळात आणखी मोठा भार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

West Asia conflict-Dry fruit trade: अमेरिका-इराण युद्धाचा थेट परिणाम आता भारतातील सुकामेवा बाजारावर दिसू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत पिस्ता, खजूर, अंजीर, केशर आणि मामरा बदाम यांच्या किमतींत लक्षणीय वाढ झाली असून व्यापाऱ्यांनी नवे ऑर्डर देणे आणि घेणे बंद केले आहे.
४० हजार कोटींचा आयात संकटात
नट अँड ड्राय फ्रूट कौन्सिल इंडियाचे (NDFC) संस्थापक सदस्य रवी मेहता यांनी सांगितले की, भारतात सुकामेव्याचा वार्षिक व्यापार ६० ते ६५ हजार कोटी रुपयांचा आहे. यातील ४० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वाटा आयातीचा आहे. पिस्ता, खजूर, अंजीर, केशर, किशमिश, मामरा बदाम यांसाठी भारत इराण, इराक, अफगाणिस्तान आणि यूएईवर पूर्णपणे अवलंबून आहे. यावेळचे संकट अधिक गंभीर असल्याचे मेहता म्हणतात, कारण यावेळी केवळ इराणच नाही तर अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, इराक आणि यूएई हे देशही युद्धाच्या झळा सोसत आहेत.
किमती किती वाढल्या?
दिल्लीतील खारी बावली या देशातील सर्वात मोठ्या सुकामेवा बाजारातील व्यापारी ऋषी मंगला यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत दरांत मोठी वाढ झाली आहे. ईरानी पिस्त्याचे भाव २०० रुपयांनी वाढून प्रतिकिलो २,१०० ते २,२०० रुपयांवर पोहोचले आहेत. खजुराचे दर गुणवत्तेनुसार २० ते १०० रुपयांनी वाढून प्रतिकिलो १५० ते १,५०० रुपयांपर्यंत गेले आहेत. अंजिरात ८० ते १०० रुपये किलोची वाढ होऊन ती १,००० ते २,००० रुपये किलोने विकली जात आहे. केशरात प्रती ग्रॅम १० रुपयांची वाढ होऊन आयातित केशर आता २०० ते २५० रुपये प्रती ग्रॅमने मिळत आहे. युद्धापूर्वी ३,५०० ते ४,००० रुपयांना मिळणारा मामरा बदाम आता ४,००० ते ४,५०० रुपये किलोने विकला जात आहे.
साठेबाजीचा धोका –
ज्यांच्याकडे सध्या साठा आहे, ते व्यापारी नवे भाव जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत. युद्ध लांबल्यास सुकामेव्याची टंचाई होऊ शकते, या अपेक्षेने ते अधिक भावाने माल विकण्याच्या तयारीत असल्याचे मंगला यांनी सांगितले. पुरवठा साखळी तुटण्याचा धोका लक्षात घेता, सर्वसामान्यांच्या खिशावर येत्या काळात आणखी मोठा भार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.





