पुणे | परतवारीच्या पालख्यांचे पुण्यात स्वागत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची परतवरी सोमवारी पुण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरात; तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी नवी पेठ येथील विठ्ठल मंदिरात सायंकाळी मुक्कामी आली.
पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ३० जुलै रोजी आळंदीकडे आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी देहूकडे मार्गक्रमण करणार आहे.
पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला (१६ जुलै) पंढरपूर येथे पोहोचला. एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याने तीन दिवस मुक्काम केला. गुरूपौर्णिमेला (२१ जुलै) काल्याच्या कीर्तनानंतर पालखी सोहळ्याची परतवारी सुरू झाली. परतवारीबरोबरही अनेक वारकरी पायी वारी करून घरी परततात.
दोन्ही पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती. वारकऱ्यांची सेवा करण्याबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पालखी सोहळा यशस्वी झाल्याबद्दल देहूरकर विश्वस्तांचा इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालखी सोहळा मंगळवारी आळंदी आणि देहूकडे मार्गक्रमण करणार असून बुधवारी (३१ जुलै) कामिका एकादशीला पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.





