अयोध्या निकालाचे स्वागत

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : आयुक्तांनी स्वत: केली पाहणी
पिंपरी (प्रतिनिधी) – अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. वादग्रस्त जागा हिंदूंचीच असल्याचा निर्वाळा देतानाच मुस्लिम समाजाला अयोध्येत पाच एकर जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे या निर्णयाचे शहरवासियांची स्वागत केले. हिंदुत्ववादी संघटनांनी या निकालावर आनंद व्यक्त केला. तर मुस्लिम बांधवांनीही अयोध्येतच मस्जिदसाठी जागा मिळणार असल्याने या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. या निकालानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा वाद अनेक वर्षांपासून सुरु होता. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. या निकालामुळे वादग्रस्त जागेवर रामाचे मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालाची शहरवासियांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आज निकाल जाहीर होणार हे शुक्रवारी सायंकाळी समजल्यानंतर त्याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. सकाळी साडे दहानंतर हा निकाल जाहीर होताच सर्वांनीच आनंद व्यक्त केला. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमचे दीड हजार पोलीस रस्त्यावर आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही आहेत. समाजकंटकांवर कारवाई केलेली आहे. नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. सायबर सेल सोशल मीडियावर नजर ठेऊन आहे. ज्याठिकाणी शांतता आहे त्या ठिकाणीच विकास होतो. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखावी.
– संदीप बिष्णोई, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त





