PUNE: वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वागत सेल

पुणे – नवीन वर्षाचे स्वागत करताना राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यात स्वागत सेल सुरु करण्यात येत आहे. याद्वारे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येणार आहे.
औद्योगिक ग्राहकांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून नवीन वर्षानिमित्त ही अतिरिक्त सेवा सुरू करण्यात येत आहे. स्वागत सेलशी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा देणार आहेत.
सद्यस्थितीत महावितरणकडून औद्योगिक वर्गवारीच्या दरवर्षी सुमारे १२०० नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. महावितरणच्या एकूण महसुलात औद्योगिक ग्राहकांचा तब्बल ४६ टक्के वाटा आहे. औद्योगिक ग्राहकांचे प्रमाण दरवर्षी सुमारे ३ टक्क्यांनी वाढत आहे.
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी औद्योगिक ग्राहकांसाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र सेवा देणारी यंत्रणा तयार करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्वागत सेलची स्थापना करण्यात येत आहे व तसे परिपत्रक महावितरणतर्फे जारी करण्यात आले आहे. येत्या तीन दिवसांत प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वागत सेल कार्यान्वित होणार आहे.





