मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील काही दिवस हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये पुढील सात दिवसांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना सतर्क राहण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हवामान विभागानुसार, १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर, तसेच १९ आणि २० ऑगस्टला गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, १७ आणि १८ ऑगस्टला किनारी आंध्र प्रदेश, तर १८ ऑगस्टला ओडिशा आणि तेलंगणात अतिमुसळधार पाऊस पडेल. १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि गुजरात, १७ ते २० ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोवा, तसेच १७ आणि १८ ऑगस्टला मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण भारतातही पावसाचा जोर दक्षिण भारतातही १७ आणि १८ ऑगस्ट रोजी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात, तसेच तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ ते २० ऑगस्ट दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात, तर १८ ते २० ऑगस्ट दरम्यान केरळमधील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर भारतात पावसाची शक्यता देशाच्या उत्तरेकडील भागातही पावसाचा जोर राहील. १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये, १७ आणि १८ ऑगस्टला हिमाचल प्रदेशात, २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान उत्तराखंडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, १७ ते १९ ऑगस्टला पूर्व राजस्थान, १७, १८, २२ आणि २३ ऑगस्टला पंजाब, २२ आणि २३ ऑगस्टला हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत, तसेच २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने सर्व नागरिकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.