Weather Update : 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली – भारताच्या शेती-आधारित अर्थव्यवस्थेची जीवनरेखा असलेल्या नैऋत्य मान्सूनची देशाच्या दक्षिणेकडील निकोबार बेटांवर आगेकुच झाली आहे असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. मान्सुनची प्रगती होण्यास सर्व घटक अनुकुल असून हा पाऊस ३१ मे पर्यंत केरळात दाखल होईल असेही या विभागाने म्हटले आहे.
नैऋत्य मान्सून रविवारी मालदीवच्या काही भागात, कोमोरिन आणि दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात, निकोबार बेटांवर आणि दक्षिण अंदमान समुद्रात पोहोचला आहे.हा मान्सुन ३१ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.नैऋत्य मान्सून केरळात दाखल होण्याची तारीख गेल्या अनेक वर्षांपासून सतत बदलत आहे.
१९१९ मध्ये तो ११ मे रोजी केरळात पोहचला होता, तर सन १९७२ साली मान्सुन केरळात पोहचण्यास कमालीचा विलंब झाला होता. त्यासाली मान्सुन १८ जूनला केरळात दाखल झाला होता.
त्या विलंबामुळे सन १९७२ साली देशात मोठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी ८ जूनला, २०२२ मध्ये २९ मे रोजी, २०२१ मध्ये ३ जून रोजी आणि २०२० मध्ये १ जून रोजी मान्सुनचे केरळात आगमन झाले होते.
सध्या देशाच्या अनेक भागात प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे तापमान ४८ अंशांवर गेले आहे. त्याचा आरोग्य आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. दक्षिण भारतात एप्रिलमध्ये उष्णतेची लाट आली होती.
या पाश्र्वभूमीवर मान्सुनचे वेळवर होणारे आगमन ही देशवासियांसाठी सुखद वार्ता आहे. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वाचा आहे, निव्वळ लागवडीखालील ५२ टक्के क्षेत्र मान्सुनच्या पावसावर अवलंबून आहे.
देशभरातील वीजनिर्मिती व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेले जलाशय भरून काढणे देखील महत्त्वाचे आहे.त्यासाठी मान्सुनचे वेळेवर आगमन महत्वाचे आहे.





